
mosquitoes विशेष म्हणजे, ‘ॲनोफिलीस स्टेफेन्सी’ ही भारतीय उपखंडासाठी नवीन प्रजाती नाही. तो भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळचे काही भाग, श्रीलंका आणि इराणमध्ये बऱ्याच काळापासून आढळत आहे आणि भारतातील अनेक शहरांमध्ये शहरी मलेरियाचा तो एक प्रमुख वाहक आहे. हा डास २०१३ च्या सुमारास भारत किंवा पाकिस्तानमधून सागरी मार्गाने जिबुतीमध्ये पोहोचला असावा आणि तेथून तो संपूर्ण आफ्रिकेत वेगाने पसरला, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. त्यामुळे, हा अभ्यास एका नवीन डासाच्या आगमनाकडे नव्हे, तर भारतीय उपखंडातील एका परिचित प्रजातीच्या आफ्रिकेतील धोकादायक विस्ताराकडे निर्देश करतो. या डासाने मलेरिया नियंत्रण कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व प्रमुख कीटकनाशकांविरुद्धची प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, असे शास्त्रज्ञांच्या अलीकडील एका जनुकीय अभ्यासात दिसून आले.
mosquitoesया आक्रमक डासाचा प्रसार थांबवणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे, असे अभ्यासाचे प्रमुख लेखक ट्रिस्टन डेनिस म्हणतात. आफ्रिकेतील स्टेफनीच्या डासांच्या समूहांमध्ये अशी जनुके आहेत, ज्यामुळे सध्याची जवळपास सर्व प्रमुख कीटकनाशके निष्प्रभ ठरतात, असे विश्लेषणात आढळून आले. दुसरीकडे, युद्ध, विस्थापन, वेगाने होणारे शहरीकरण, हवामान बदल आणि मलेरिया नियंत्रण कार्यक्रमांसाठीच्या निधीत होणारी घट यामुळे निगराणी यंत्रणा कमकुवत झाली आहे. हा डास चाड, सोमालिया, एरिट्रिया आणि दक्षिण सुदानसारख्या देशांमध्ये पोहोचला असेल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. परंतु, पुरेशा देखरेखीच्या अभावामुळे याची पुष्टी करता येत नाही.