लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
सिनालोआ,
Influencer shot during live streaming मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यात सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर सीझर गॅस्टेलम याची गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कुलियाकन शहरात मंगळवारी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, इन्फ्ल्युएंसर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सीझर गॅस्टेलम हा अन्य दोन व्यक्तींसोबत केएफसीच्या पार्किंग परिसरात असताना दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून तेथे पोहोचले. त्यापैकी एका हल्लेखोराने सीझरवर गोळीबार केला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
 

ws 
 
सीझरच्या हत्येमागे मेक्सिकोतील कार्टेलशी संबंधित हिंसाचार असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही विशिष्ट गुन्हेगारी संघटनेला या हत्येसाठी जबाबदार ठरवण्यात आलेले नाही. तपासादरम्यान सीझरने यापूर्वी केलेल्या काही व्हिडीओंचीही चौकशी केली जात आहे. या व्हिडीओंमध्ये त्याने एका गुन्हेगारी गटाचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून हत्येच्या कारणाचाही तपास केला जात आहे. सीझर गॅस्टेलमचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग होता. टिकटॉकवर त्याचे ६,५०,००० हून अधिक फॉलोअर्स होते. इतर सोशल मीडिया मंचांवरही त्याची चांगली लोकप्रियता होती. त्यामुळे त्याच्या हत्येच्या वृत्तानंतर सोशल मीडिया क्षेत्रातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.