भंडारा,
police sandeep patil चिमुकली वरील अत्याचार प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशील आणि काटेकोरपणे करीत आहे. पुढच्या आठ दिवसात तपास पूर्ण करून त्याला दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल, असा विश्वास नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला. साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर आज भंडारा शहरात भंडारेकरांनी एकत्रित येत मोर्चा काढला. काल नागरिकांनी व्यक्त केलेला संताप आणि आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही हे प्रकरण तेवढ्याच गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी भंडाऱ्याला भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणासंदर्भात बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या. आरोपी रोहित संजय वासनिक याच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात कलम 64, 64(2),(आय), 115(2), 65(2) आणि 4,6 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या विरोधात यापूर्वी एक विनयभंग आणि एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. दोन्ही प्रकरणात न्यायालयात आरोप पत्र दाखल असून, न्यायालयाने जामीन दिल्याने सध्या आरोपी बाहेर होता, असे पाटील यांनी सांगितले.
घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेचा तपास पुढील आठ दिवसात पूर्ण करू. पवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ज्योतिका इंगळे त्यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून त्यांच्याच नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर तज्ञ आणि इतर अधिकाऱ्यांचा या तपास पथकात समावेश आहे. तपास पूर्ण होताच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असून हा खटला जलद गती न्यायालयात चालावा आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती या प्रकरणी करण्यात यावी यासाठी शासनाकडे विनंती करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
आरोपी मनोरुग्ण आहे का या संदर्भात बोलताना, पाटील यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकच स्पष्ट करू शकतील, असे सांगताना मनोरुग्ण असण्याचा फायदा मात्र आरोपीला मिळू देणार नाही, त्या दृष्टीनेच तपास करू असा विश्वासही बोलून दाखवला. आरोपीची तब्येत बिघडली असल्याने त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भंडारा शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर यावेळी त्यांनी उत्तरे दिली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्योतिका इंगळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.