नवी दिल्ली,
IRCTC's new website भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग सेवा अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटची नवीन बीटा आवृत्ती सुरू केली आहे. नव्या संकेतस्थळावर नियमित तिकिटांसोबतच तत्काळ तिकिटेही बुक करता येणार आहेत. मात्र, पहिल्यांदा वेबसाइटवर लॉग इन करणाऱ्या प्रवाशांना काही आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.नवीन वेबसाइटमध्ये वापरकर्त्यांना आवश्यक माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी विविध विभागांची रचना करण्यात आली आहे. वेबसाइटचे स्वरूप अधिक वापरकर्ता-सुलभ करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नव्या वेबसाइटवर प्रथमच प्रवेश केल्यानंतर वापरकर्त्यांना आपला ईमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक सत्यापित करावा लागेल. त्यासाठी लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या ‘यूझर आयडी’वर क्लिक करून ‘माय प्रोफाइल’मध्ये जावे लागेल. त्यानंतर ‘ऑथेंटिकेट यूझर’ हा पर्याय निवडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आधार कार्ड आधीच आयआरसीटीसी खात्याशी जोडलेले आणि प्रमाणित असल्यास प्रवाशांना थेट तत्काळ तिकीट बुक करता येईल. आधार प्रमाणीकरण झालेले नसल्यास ‘ऑथेंटिकेट यूझर’ पर्यायातून आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना नव्या आयआरसीटीसी बीटा वेबसाइटवरून तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे.