चांदूर रेल्वे
municipal-council-chandur-railway शहरातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा आम आदमी पक्षाचे नेते नितीन गवळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या तक्रारीनंतर नगर परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर प्रशासकीय खुलासा सादर केला आहे. तसेच पाणी शुद्धीकरण, निर्जंतुकीकरण आणि गळती दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
municipal-council-chandur-railway शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नितीन गवळी यांनी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए), अमरावती विभागाकडे ऑनलाईन दाखल केली होती. त्याची दखल घेत एफडीएने हे प्रकरण नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे वर्ग करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या खुलाशात, मालखेड तलावातील उन्हाळ्यातील कमी जलसाठ्यामुळे पाणी काही प्रमाणात गढूळ होत असले तरी नागरिकांना पुरवठा करण्यापूर्वी तुरटी, क्लोरिन व ब्लिचिंग पावडरद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केले जात असल्याचे नमूद केले आहे. तसेच नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत वेळोवेळी दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे सूचना देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
municipal-council-chandur-railway प्रयोगशाळेच्या तपासणीत दूषित आढळलेले तीन नमुने हे नगर परिषदेच्या सार्वजनिक नळयोजनेतील नसून खाजगी विहीर व बोअरवेलमधील असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संबंधित विहीर व बोअरवेलधारकांना सूचना देण्यात आल्या असून पाईपलाईन व व्हॉल्व्ह दुरुस्ती, निर्जंतुकीकरण आणि ब्लिचिंग पावडरद्वारे शुद्धीकरण सुरू असल्याचेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे. तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेलाही आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी नितीन गवळी व माजी नगरसेवक मेहमूद हुसेन यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसमवेत मालखेड तलाव आणि शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला या विषयावर अधिकृत भूमिका स्पष्ट करावी लागली असून, पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा आणि नियमित तपासणीबाबतची कार्यवाही गतिमान होण्याची अपेक्षा शहरवासीयांना आहे.