समाजमाध्यमांची ‘मेटा’कुटी!

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
अग्रलेख...

meta kuti of social media समाजमाध्यमांचे वेगवेगळे मंच हे केवळ संवाद साधण्याचे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचे साधन आहे, असा या माध्यमांच्या मंचावर वावरणाऱ्या सर्वसामान्यांचा समज असला, तरी हे माध्यम तेवढ्यापुरतेच नाही, हे आता लक्षात येऊ लागले आहे. तळहातावरल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी एखादी जाहिरात किंवा कोणताही एखादा अवांतर मजकूर सहज कुतूहल म्हणून पाहण्यासाठी मारली जाणारी एक टिचकीदेखील या माध्यमाच्या समाजास अनभिज्ञ असलेल्या कोणा अज्ञात ‘अतींद्रिय’ शक्तीचा अनुभव देते, हे अनेकांनी अनुभवले असेल. एखाद्या उत्पादनाची किंवा करमणुकीच्या माध्यमाची जाहिरात पाहिली की पाठोपाठ इच्छा नसताना सुरू होणारा अशा जाहिरातींचा भरमसाट मारा हे या माध्यमांच्या मार्केटिंगचे मूळ सूत्र असते, याची सहसा जाणीव कोणास होत नसली, तरी या सूत्रानुसारच समाजमाध्यमांचा धंदा चालतो आणि सामान्य वापरकर्ता मात्र आपल्या कुतूहलाचा कंड शमविण्यासाठी सतत स्क्रीनवर ‘स्क्रोल’ करत आपला वेळ घालवत राहतो.
 
 
meta kuti of social media
 
गेल्या काही दिवसांत या माध्यमाने अनेक क्षेत्रांत प्रचंड खळबळ माजविली आणि समाजाचे सुरळीत चाललेले दैनंदिन रहाटगाडगे पुरते उलटेसुलटे करून टाकले, हे आपल्या देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत झालेल्या अनपेक्षित उलथापालथीनंतर स्पष्ट झाले. जंतर मंतरवरील जेन-झीच्या आंदोलनानंतर गेल्या २३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवरून देशातील युवकांना उद्देशून प्रसारित केलेला व्हिडीओ संदेश तात्पुरता हटविण्यात आल्यानंतर या माध्यम-मंचाचे एक नवे रूप समोर आले. यामुळे सरकारी स्तरावर निर्माण झालेल्या राजकीय वादळाचे पडसाद देशभर उमटले आणि व्हिडीओ संदेश हटविण्यामागील कारण स्पष्ट करून माफी मागण्याची तंबी ‘मेटा’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना सरकारने दिली.
 
 
मेटाने माफी मागितली नाही, तर या कंपनीस मिळणारे संरक्षण गमवावे लागेल, असा इशाराही सरकारने दिल्यानंतर, व्हिडीओ हटविण्याच्या कृतीवर स्पष्टीकरण देताना एका तांत्रिक चुकीचे कारण देत या कंपनीचे जागतिक सार्वजनिक धोरणप्रमुख जोएल कॅपलॉन यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या वतीने भारत सरकारची माफी मागितली. हे प्रकरण वरवर दिसते तेवढे सहज नाही, यामागे एक आखणीबद्ध व्यवसाय-नीती कार्यरत असते, ही बाब या निमित्ताने आता समोर येऊ लागली आहे. याच कंपनीच्या अन्य एका माध्यम मंचावर दिसणाऱ्या बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातींचीही गंभीर दखल घेतली गेली आणि कोणत्याही एखाद्या विशिष्ट प्रकारचा मजकूर, जाहिराती किंवा वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणाऱ्या ‘कंटेन्ट’ला चालना देण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असते, हे उघड झाले. अशा प्रकारचा बेकायदेशीर ‘कन्टेन्ट’ विशिष्ट प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली गेल्याचे सांगण्यात येते. या चुकीबद्दल मेटाने माफी मागून खेद व्यक्त केला असला, तरी समाजमाध्यम हा केवळ वेळ घालविण्याचा मंच नसून सावधगिरीने वावरण्याचे स्थान आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
 
 
अशा प्रकारच्या अनेक घडामोडी या मंचाद्वारे नेमक्या आणि निवडक समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यात येतात हे जेन-झी आंदोलनानंतर स्पष्ट झाले. या आंदोलनास या माध्यमाच्या विविध मंचांवरून सुरू झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरदार प्रवाहाचेच बळ लाभले होते, हे स्पष्ट आहे. केवळ भारतातच नव्हे, तर गेल्या चार-दोन वर्षांत, विशेषतः कोविडोत्तर काळातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा वेग प्रचंड वाढला आहे. अनेक क्षेत्रांत अनपेक्षित आणि अनाकलनीय रीतीने घडणाऱ्या घडामोडींनी सामान्यांचे जग संभ्रमित होऊन गेले आहे. समाजमाध्यमांचे मंच या संभ्रमात मोलाची भर घालण्याकरिता सतत सरसावून बसलेले आहेत, हे आता गुपित राहिलेले नाही. म्हणूनच, सामान्यांच्या दृष्टीने समाजमाध्यमे हे केवळ वेळ घालविण्याचे संवाद साधण्यात किंवा मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्याचे हक्काचे साधन असले, तरी त्यामागे जागतिक स्तरावरील समाजकारण, सांस्कृतिकता किंवा अर्थकारणास हवे तसे वळण देण्याची ताकद आहे, याचा अनुभवही येऊ लागला आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेची हत्यारे अधिक धारदारपणे आक्रमक झालेली आहेत.
 
 
या हत्यारांनी रोजगाराच्या असंख्य संधी घायाळ झाल्याने, हे आक्रमण आणखी कोणते अराजक माजविणार या भीतीने समाज ग्रस्त झालेला आहे. कारण तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कल्पनातीत असून त्या वेगाने धावणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे तर आहेच, पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामान्य मेंदूच्या बुद्धीने वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यातही सामान्य माणसे कमी पडत आहेत. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून समाजमाध्यमांचे वेगवेगळे मंच सामान्यांच्या सहज जीवनात धुमाकूळ घालू शकतात. त्यामुळे प्रसंगी समाजस्वास्थ्य संकटातही येऊ शकते हेदेखील आता स्पष्ट झाले आहे. केवळ ‘फॉलोअर्स आणि ‘लाईक्स’द्वारे स्वयंप्रतिमा निर्माण करण्याच्या वेडाने झपाटलेल्या पिढ्यांच्या मनाचा कब्जा या मंचाने घेतल्याचे स्पष्ट झाल्याने या माध्यमाचा मवाळ मुखवटा दूर होऊ लागला असून धंदेवाईक चेहऱ्याने या माध्यमाचे वेगवेगळे मंच आता मानवी व्यवहारांवर कब्जा करण्यासाठी सरसावले आहेत. अलिकडेच देशाच्या राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर झालेल्या जेन-झीच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरविण्यात या माध्यमाच्या मंचाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आसपासच्या अन्य काही देशांतील जेन-झीच्या आंदोलनांनादेखील या माध्यम-मंचाचे मोठे बळ लाभले होते.
 
 
या माध्यमांचे सर्व मंच मोफत आहेत, असे वरवर पाहता वाटत असले, तरी त्यामागे मोठे अर्थकारण कार्यरत असते. फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेडस, व्हॉटसॲपचा सर्वसामान्यांकडून होणारा वापर हे मेटासारख्या कंपन्यांचे उत्पादन नसते, तर वापरकर्त्यांकडून वापरला जाणारा डेटा आणि वापरकर्त्यांनी या मंचावर वावरण्यासाठी खर्च केलेला वेळ हे या क्षेत्राचे व्यावसायिक उत्पादन असते. या मंचाचा वापर करणाऱ्या घटकांच्या वर्गवारीनुसार विशिष्ट जाहिराती त्यांच्यासमोर प्रसृत करणे, वापरकर्त्यांच्या वर्तन आणि डेटा वापराचे विश्लेषण करणे, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसारख्या मंचावर आपले ‘पेज’ चालविणाऱ्यांकडून खऱेदी केल्या जाणाऱ्या जाहिराती, ऑनलाईन व्यवसाय वृद्धीसाठी ग्राहकांशी साधला जाणारा संपर्क आदी अनेक बाबींद्वारे या मंचाला मोठे उत्पन्न मिळत असते. शिवाय, विशिष्ट वापरकर्ते कोणत्या बाबींवर विशेष लक्ष देतात याचे विश्लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यासाठीही वापरकर्त्यांचाच वापर केला जातो.
 
 
अशा प्रकारे वापरकर्त्याच्या मानसिकतेचे नेमके विश्लेषण केल्यानंतर कोणत्या वापरकर्त्यास कोणत्या जाहिराती दाखवायच्या कोणता मजकूर त्याच्यासमोर ठेवायचा आणि कोणता मजकूर त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायचा नाही, हे ठरविणारी अल्गोरिदम नावाची एक प्रशासकीय यंत्रणा हेच काम करत असते. वापरकर्त्याने अधिकाधिक वेळ मंचावर वावरत राहावे याची नेमकी नीती अल्गोरिदमद्वारे ठरली, की जेवढा जास्त वेळ मंचावर वावर असेल, तेवढ्या जास्त पोस्ट त्याच्यासमोर दाखविल्या जातील आणि तितक्या अधिक जाहिरातींचा मारा वापरकर्त्यावर करून अधिकाधिक महसूल मिळविता येईल, हे या मंचाचे अर्थकारण सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांच्या सवयी आणि आवडीनिवडीचे नेमके विश्लेषण करून त्याच्या मनावर ताबा मिळविण्याचा व त्याला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडण्याचा हा एक मानसशास्त्रीय खेळ पाहता, समाजमाध्यम हे केवळ संवादाचे साधन नाही, तर एका लक्ष्यवेधी अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे हे उघड दिसते. हा केंद्रबिंदू माणसांना खिळवून ठेवतो, त्याच्या मानसिकतेचा वेध घेऊन त्यानुसार आपल्या व्यवसायाची सामग्री वाढवतो आणि जाहिरातींचा मारा करून त्याद्वारे महसूल गोळा करतो. पंतप्रधानांचे भाषण अल्पकाळ वगळण्याच्या तांत्रिक चुकीचे विश्लेषण करतानाही, संपत्ती निर्मितीवर होणाऱ्या परिणामांचे काही आडाखे बांधले गेले असतील, यात शंका नाही.