दहावीतील 15 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा , शिरपूर पोलिसांकडून शोध सुरू

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
minor girl student missing वणी तालुक्यातील एका गावातील इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी संशयास्पदरित्या बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत आहे.
 
 
minor girl student missing
 
 
पोलिस सूत्रांनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी मजूर दाम्पत्याची असून ती दहावीत शिकत आहे. ती दररोज एसटी बसने शिक्षणासाठी कोरपना येथे ये-जा करीत असते. रविवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी तिचे आई-वडील मजुरीसाठी गेले होते. त्यावेळी मुलगी आणि तिची धाकटी बहीण घरी होत्या. संध्याकाळी आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरात आढळून आली नाही. याबाबत तिच्या धाकट्या बहिणीकडे चौकशी केली असता, ती बाहेर खेळण्यासाठी गेली होती आणि तिला बहिणीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी घरात पाहणी केली असता मुलीचे शाळेचे दप्तरही घरात नसल्याचे निदर्शनास आले.
 
कुटुंबियांनी नातेवाईक, गाव तसेच परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या वडिलांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात या मुलीचा तपास सुरू आहे.