पुणे
human trafficing पुण्यातील एका कंपनीने युरोपमधील चॉकलेट कंपनी, सुपर मार्केटमध्ये कॅशियरची नोकरी आणि दीड लाख रुपयांच्या पगाराचे आमिष दाखवत नागपुरातील विवाहितेची पोर्तुगालमध्ये कथितरीत्या विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. २८ वर्षीय विवाहितेने दाखल केेलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेला विदेशात पाठवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, तिने महिलेने प्रसंगावधान दाखवत तेथून सुटका करून घेतली. या प्रकरणी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अझहर शेख, कपिल मिश्रा तसेच पोर्तुगालमधील अनिलकुमार, वामधस, चैतन्य आणि हिम्मतसिंगवर भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, गुन्हेगारी कट, धमकी, मानवी शोषणासह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या महिलेचे बी.कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये तिला इन्स्टाग्रामवर ‘वुई मायग्रेट’ कंपनीची जाहिरात दिसली. पोर्तुगाल, स्पेन, नेदरलँड्ससह विविध युरोपीय देशांमध्ये सुपर मार्केट, चॉकलेट कंपन्या आणि इतर ठिकाणी नोकरीचे आमिष कंपनीने दाखविले. दरमहा दीड लाख रुपये पगार, आठ तास काम आणि आठवड्यातून दोन दिवस सुटी अशा सुविधा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर महिलेला विमाननगर येथील कार्यालयात बोलावून तिचा विश्वास संपादन करण्यात आला. व्हिसा, वर्क परमिट, तिकीट, विमा आणि इतर खर्चाच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने तिच्याकडून आठ लाख रुपये घेण्यात आले.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे २०२६ मध्ये महिलेला स्पेनमध्ये आणि नंतर पोर्तुगालमध्ये नेण्यात आले. एका वसतिगृहात रात्र काढल्यानंतर तिला अज्ञात ठिकाणी तिचा पासपोर्ट काढून दोन दिवस एका खोलीत डांबून ठेवले. पासपोर्ट परत करण्यासाठी तिच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. भीतीपोटी तिने स्वतःजवळील ४०० युरो देऊन पासपोर्ट परत मिळविला. त्यानंतर, तिला पोर्तुगालमधील एका गावात नेऊन बिअर विक्रीच्या दुकानात साफसफाईचे काम करण्यास भाग पाडले. तिने भारतातील एजंटकडे तक्रार केली. मात्र, तात्पुरत्या वास्तव्याचे ओळखपत्र मिळेपर्यंत असे काम करावे लागेल, असे सांगण्यात आले. तेथे काम करणाऱ्या अन्य दोन भारतीय तरुणींनीही तिला मालक सांगेल त्या व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाईल, असे सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मालकाला आपण सांगितलेले काम करतो, असे भासवून २९ जून रोजी पहाटे तेथून स्वत:ची सुटका केली. बसने तिने दुसरे शहर गाठले. रात्र बसस्थानकावर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती एका हॉटेलमध्ये लपून राहिली. त्यानंतर विमानाने दोहामार्गे ती दिल्ली येथे पोहोचली. तेथून तिने पतीला बोलावून घेतले आणि तिने नागपूर गाठले.
भारतात परतल्यावरही तीन लाखांची मागणी
भारतात परत आल्यानंतर संबंधित कंपनीकडून तिच्याकडे पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पतीला अडकविण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रशांत माने पुढील तपास करीत आहेत.