आजी-आजोबांच्या हत्येनंतर केला शाळेत गोळीबार!

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
बँकॉक,
opened fire at school बँकॉकजवळील एका शाळेत शुक्रवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने थायलंड हादरले आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर या हल्ल्याचा आरोप असून, या घटनेत तीन शिक्षक, चार विद्यार्थी आणि त्याचे आजी-आजोबा अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित विद्यार्थ्याने शाळेत जाण्यापूर्वी आपल्या घरी आजी-आजोबांवर गोळीबार केला. त्यानंतर तो शाळेत पोहोचला आणि तेथे विद्यार्थी व शिक्षकांवर गोळीबार केला. घटनेनंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
opened fire at school
 
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू असून, गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक कुटुंबातील एका सदस्याकडून विद्यार्थ्याने घेतल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.गोळीबारामुळे शाळेच्या परिसरात मोठी घबराट पसरली. विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी धावले, तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन पथकाने मदतकार्य सुरू केले. थायलंडचे शिक्षण मंत्री प्रसेर्ट जंतारारुआंगटोंग यांनीही घटनेची पुष्टी केली असून, मृतांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगितले. एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने गोळीबाराचे आवाज ऐकून सुरुवातीला ते फटाक्यांचे आवाज असल्याचे वाटल्याचे सांगितले. घटनेनंतर शाळेबाहेर शिक्षक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली असून, या घटनेतील सर्व बाबींचा तपास केला जात आहे.