चिमुकली वरील अत्याचारा विरोधात भंडाऱ्यात एल्गार...

हजारो विद्यार्थिनींसह भंडारेकर न्यायासाठी रस्त्यावर!

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
भंडारा,
outcry in bhandara अत्याचाराच्या विरोधात जनमानस पेटून उठला की, न्याय मिळण्याच्या आशा बळावतात. आज अशाच जनआक्रोशाचे दर्शन भंडारेकरांनी घडविले. साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरले. शाळकरी विद्यार्थिनीसह सर्वसामान्य नागरिकांनी पुकारलेला हा एल्गार लोकांच्या मनातील प्रचंड संताप उघड करणारा होता. आरोपीला फाशी द्या, त्यासाठी जलद गती न्यायालयात प्रकरण चालवा अशी मागणी यावेळी लावून धरली गेली. घटनेच्या निषेधार्थ आज भंडारा बंदलाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शाळांनी घटनेचा निषेध करीत बंदमध्ये सहभाग घेतला.
 
 
 
outcry in bhandara
 
 
शहरातील आंबेडकर वार्डातील समाज भावनाच्या स्वच्छतागृहात नेऊन एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार सहा ऑगस्ट रोजी उघडकीस आला. तीस वर्षीय रोहित वासनिक या आरोपीने केलेल्या घृणास्पद कृत्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळून आली. पोलिसांनी कारवाई करीत आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीने घटनेनंतर स्वतःला इजा करून घेतली होती. आरोपी हा मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याचे सांगितले जाते. मात्र या संदर्भात अधिकृत अजून कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. पीडित मुलगी आणि आरोपीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना 6 हजारोच्या संख्येत एकत्रित येत आरोपीला ताब्यात देण्याचा आग्रह सुरू केला. प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि हजारो नागरिक यांच्यात रात्री बारा वाजेपर्यंत यासाठी ओढाताण सुरू होती. अखेर रात्री उशिरा हा विषय शांत झाला. तर त्याच वेळी आज सात रोजी भंडारा बंद करून निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या अधिपत्याखाली न काढता स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन केले गेले. चिमुकली वरील अन्यायाच्या विरोधात व अशा विकृत प्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी नागरिकांनी एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आल्यानंतर हजारो नागरिक गांधी चौक परिसरात एकत्र आले. यात विद्यार्थिनी आणि तरुणी तरुणींचा सहभाग मोठा होता. सर्वसामान्य नागरिक ही आंदोलनात सहभागी झाला होता. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. फाशीची शिक्षा आणि जलद गती न्यायालयात चालविण्याची मुख्य मागणी यावेळी लावून धरण्यात आली. एकीकडे मोर्चा निघाला असताना दुसरीकडे शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याचे चित्र होते. व्यापाऱ्यांपासून छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ आपले योगदान या निमित्ताने दिले.outcry in bhandara शहरातील बऱ्याच शाळांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवीत घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अन्यायाविरुद्ध एकत्रित लढा उभारण्यासाठी नेहमी तयार रहा असे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थिनींनी यावेळी शहरात महिला असुरक्षित असल्याची तक्रारही पोलिसांकडे केली.
नूतन कन्या शाळेचे सौजन्य
चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत नूतन कन्या शाळेच्या व्यवस्थापनाने सौजन्याचे दर्शन घडविले. शाळेला सुट्टी जाहीर केली. त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून घटनेचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे या शाळेच्या असंख्य विद्यार्थिनी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. महिला अत्याचाराच्या विरोधात महिलांसाठी चालविल्या जाणाऱ्या या शाळेने घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरली. या मोर्चात शाळेच्या शिक्षक शिक्षिकाही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.
....