अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील प्रलंबित वनविषयक प्रश्न मार्गी लगाणार

आ. बडोले यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
arjuni morgaon मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनविषयक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

arjuni morgaon
बैठकीत झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या परवानग्यांतील अडचणी दूर करण्याबाबत, तसेच इटियाडोह प्रकल्प परिसरातील विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय तिबेटी कॅम्प पुनर्वसन धोरण-२०२४ ची प्रभावी अंमलबजावणी, जमिनीच्या भाडेपट्टा कराराची प्रक्रिया पूर्ण करणे, सडक अर्जुनी तालुक्यातील २०८ पैकी २०७ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, वनजमिनीचे पट्टे वाटप, व्याघ्र प्रकल्पामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी तसेच विकासकामांसाठी आवश्यक निधी आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीस साकोलीचे आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, विदर्भ पाटबंधारे विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले.