वर्धा,
wardha theatre वर्धा जिल्ह्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र, शहरात अद्याप सुसज्ज बंदिस्त नाट्यगृह नसल्याने कलाकार, साहित्यिक आणि कलारसिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नाट्यगृह उभारणीचा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरला आहे. यासंदर्भात त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला सांस्कृतिक कार्य विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ व ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिली होती. मात्र, नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे नाट्यगृहाचे काम सुरू होऊ शकले नाही. २२ ऑगस्ट २०२५ रोजी आशिष शेलार वर्धा येथे आले असता त्यांनी नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सा. बां. विभागाने जागेच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रक तयार करून मुख्य अभियंता यांच्या तांत्रिक सहमतीसह जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यताकरिता १ जून २०२६ रोजी शासनाकडे सादर केला. त्यामुळे बंदिस्त नाट्यगृहाच्या कामास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. शेलार यांच्याकडे केली. सदर मागणीच्या अनुषंगाने शेलार यांनी सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले.
नाट्यगृहासाठी ४२.६६ कोटींचा प्रस्ताव
महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. १२०० आसण संख्या असलेल्या ४३७५.९२० चौ.मी.मध्ये सुसज्ज नाट्यगृहाची निर्मिती होणार आहे. लोअर ग्राऊंड फ्लोअर ४२८.९७० चौ.मी., ग्राऊंड फ्लोअर २८१२.२८० चौ. मी. व फर्स्ट फ्लोअर ११३४.६७० चौ. मी.चा राहणार आहे.
कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ मिळणार : ना. भोयर
नाट्यगृहाला मान्यता मिळाली होती. मात्र, जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने काही अडचण आली होती. ती अडचण दूर करण्यात येऊन नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.wardha theatre नाट्यगृहामुळे स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होईल, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उंची प्राप्त होईल, अशी प्रतिक्रीया पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.