रहाणेचा ‘नवा डाव’ सुरू!

स्टीव्ह स्मिथसोबत खेळणार

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
Rahane's new innings begins भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे आता प्रथमच परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रहाणेने युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या (ETPL) पहिल्या हंगामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑगस्ट रोजी त्याच्या संघातील समावेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली.२६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ईटीपीएलमध्ये रहाणे ‘मार्की प्लेयर’ म्हणून अॅमस्टरडॅम फ्लेम्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा मोठा अनुभव असून, त्याने आतापर्यंत ३०८ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने ५६ अर्धशतके आणि २ शतकांसह ३०.२९ च्या सरासरीने ७९६८ धावा केल्या आहेत.
 
 
 
rahane
 
 
ईटीपीएलमध्ये खेळण्याबाबत रहाणेने सांगितले की, क्रिकेटने त्याला खूप काही दिले असून आता खेळाला काहीतरी परत देण्याची संधी म्हणून तो या स्पर्धेकडे पाहत आहे. युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यास मोठी संधी असून, अॅमस्टरडॅम फ्लेम्सच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यास आणि युरोपियन क्रिकेटचे भविष्य मजबूत करण्यासाठी काम करण्यास उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. अॅमस्टरडॅम फ्लेम्स संघाशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज स्टीव्ह वॉ यांचेही नाते आहे. ते संघाचे सह-संस्थापक आणि मुख्य क्रिकेट अधिकारी आहेत. रहाणेसोबत स्टीव्ह स्मिथ, टिम डेव्हिड, मायकल ब्रेसवेल आणि मिचेल मार्श यांसारखे नामांकित टी-२० खेळाडू संघात आहेत. मिचेल मार्शकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ईटीपीएलचा पहिला हंगाम २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबरदरम्यान होणार आहे. अॅमस्टरडॅम फ्लेम्सचा पहिला सामना २६ ऑगस्टला वूरबर्ग येथील स्पोर्टपार्क डुइवेस्टाइन स्टेडियमवर रॉटरडॅम डॉकर्सविरुद्ध होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी ६.४५ वाजता सुरू होणार आहे.