मुंबई,
Remo Fernandes's retirement पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गायक-गीतकार रेमो फर्नांडिस यांनी थेट संगीत कार्यक्रमांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनेक दशकांच्या संगीत प्रवासानंतर त्यांनी यूकेमधील हाउन्स्लो येथील क्रॅनफर्ड कम्युनिटी कॉलेजमध्ये आयोजित ‘गोवा डे’ कार्यक्रमात आपल्या निवृत्तीची घोषणा केली.रेमो फर्नांडिस यांनी आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे पूर्वीप्रमाणे मंचावर सादरीकरण करणे शक्य नसल्याचे सांगितले. कोविड-१९ लसीचा तिसरा डोस घेतल्यानंतर सौम्य पक्षाघाताचा त्रास झाल्याने त्यांच्या बोटांच्या हालचालींवर परिणाम झाला. त्यामुळे गिटार आणि बासरी वाजवताना अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
या आरोग्यविषयक अडचणींमुळे मागील वर्षी त्यांना यूकेमध्ये कार्यक्रम करता आला नव्हता. मात्र, ‘गोअन यूके’चे अध्यक्ष रवी वाझ यांनी यंदा पुन्हा आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांसमोर सुमारे एक तास संगीत सादर केले. रेमो फर्नांडिस यांनी आपल्या कारकिर्दीत इंडिपेंडंट रॉकसह बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली. ‘जलवा’च्या शीर्षकगीतामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘बॉम्बे’ चित्रपटातील ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हुम्मा हुम्मा’ या गाण्याने त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. त्यांच्या अंतिम थेट कार्यक्रमात ‘मारिया पिटाचे’ आणि ‘हुम्मा हुम्मा’सह त्यांच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच ‘प्यार तो होना ही था’, ‘हुइया हो’ आणि ‘खामोशी: द म्युझिकल’मधील ‘दौड’ यांसारख्या गाण्यांमधूनही त्यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.