व्हॉट्सॲपवर एआय एजंटचा धोका?

स्पॅम संदेशांचा वाढू शकतो सुळसुळाट

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
risk of ai agents on whatsapp व्हॉट्सॲपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. वैयक्तिक संवादापासून व्यावसायिक कामांपर्यंत विविध कारणांसाठी या संदेशवहन मंचाचा वापर केला जातो. मात्र, अनोळखी क्रमांकांवरून येणारे स्पॅम आणि जाहिरातींचे संदेश ही वापरकर्त्यांसमोरील जुनी समस्या आहे. आता एआय एजंटच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.एआय एजंट म्हणजे केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे संगणकीय साधन नसून, वापरकर्त्याच्या आदेशानुसार स्वतः निर्णय घेऊन विविध कामे पूर्ण करू शकणारी प्रणाली आहे. नियोजन, माहिती समजून घेणे आणि कार्य पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे तिकीट बुकिंग, खरेदी किंवा इतर ऑनलाइन कामे कमी मानवी हस्तक्षेपात पूर्ण करता येतात.
 
risk of ai agents on whatsapp
 
सायबर सुरक्षा क्षेत्रातील झेनिटी या कंपनीच्या अभ्यासानुसार, एआय एजंटचा गैरवापर झाल्यास व्हॉट्सॲपवरील संपर्कांना मोठ्या प्रमाणावर स्पॅम संदेश पाठवण्याची प्रक्रिया स्वयंचलित करता येऊ शकते. या अभ्यासात ओपनएआयच्या ॲटलस ब्राउझरमध्ये एआय एजंटच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर स्पॅम संदेश पाठवण्याची शक्यता तपासण्यात आली. मात्र, यामध्ये व्हॉट्सॲपचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन भेदले गेले नसल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
 
  
मुख्य धोका एआय एजंटला वापरकर्त्याच्या वतीने ब्राउझरवर काम करण्यासाठी मिळणाऱ्या प्रवेशाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.अभ्यासानुसार, ओपनएआय, गुगल, अँथ्रोपिक, मायक्रोसॉफ्ट आणि पर्प्लेक्सिटीसारख्या कंपन्यांच्या एआय ब्राउझर आणि विस्तारांमध्ये २० पेक्षा अधिक सुरक्षा समस्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा त्रुटींचा गैरवापर झाल्यास संगणकातील फाइल्सपर्यंत पोहोचणे, पासवर्ड व्यवस्थापकावर नियंत्रण मिळवणे, अनधिकृत ऑनलाइन खरेदी करणे आणि संदेशवहन मंचांवरील स्पॅम मोहीम स्वयंचलित करणे यांसारखे धोके निर्माण होऊ शकतात.
 
या नव्या तंत्रज्ञानामुळे ब्राउझर सुरक्षेसमोरही वेगळे आव्हान उभे राहिले आहे. एआय एजंट कमीतकमी वापरकर्ता हस्तक्षेपासह विविध संकेतस्थळांवर काम करू शकत असल्याने त्यांना दिलेल्या परवानग्यांकडे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. झेनिटीचे सहसंस्थापक मायकेल बर्गरी यांच्या मते, एआय एजंटमुळे ब्राउझरच्या पारंपरिक सुरक्षा नियंत्रणांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे.
 
 
या संदर्भातील ॲटलस ब्राउझरची त्रुटी झेनिटीने याच वर्षी जानेवारीत ओपनएआयच्या निदर्शनास आणून दिली होती. ओपनएआयने प्रॉम्प्ट-इंजेक्शन हल्ल्यांवर सातत्याने संशोधन सुरू असल्याचे सांगत, संबंधित समस्या दूर करण्यासाठी अद्यतने जारी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ओपनएआयने ॲटलस बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो ९ ऑगस्ट २०२६ रोजी काम करणे थांबवणार असल्याची अधिकृत माहिती कंपनीने दिली आहे.