मुंबई
Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat news समाजात अनेकदा आजच्या आधुनिक तरुण पिढीच्या वागण्या-बोलण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या ‘जेन-झी’ पिढीबाबत अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक विचार मांडले आहेत. आजची नवी पिढी ही आमच्या पिढीपेक्षाही अधिक प्रामाणिक आणि देशभक्त आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा आपण त्यांना समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. मुंबईतील बीकेसी भागात आयोजित भव्य कार्यक्रमात तरुणाईशी त्यांनी संवाद साधला.तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारी आजची युवा पिढी भरकटत चालली आहे, असा एक सर्वसामान्य समज जुन्या पिढीमध्ये अनेकदा दिसून येतो. मात्र, या समजाला छेद देत डॉ. मोहनजी भागवत यांनी नव्या पिढीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले की, या पिढीमध्ये देशाबद्दल प्रचंड प्रेम आणि तळमळ आहे. त्यांचा प्रामाणिकपणा हा त्यांच्या विचारांमधून आणि कृतीतूनही दिसून येतो. केवळ त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती आधुनिक आणि वेगळ्या असू शकतात, पण त्यांची मातृभूमीवर असलेली निष्ठा वादातीत आणि ज्वलंत आहे.
सध्याच्या काळात देशात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तरुणांकडून होणाऱ्या आंदोलनांच्या पृष्ठभूमीवर बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक पैलूकडे लक्ष वेधले. तरुणांची आंदोलने ही देशविरोधी किंवा विघातक प्रवृत्तीतून होत नाहीत, तर ती संवादाच्या अभावामुळे उद्भवतात, असे परखड मत त्यांनी मांडले. आपण या पिढीला योग्य प्रकारे समजून घेण्यात कमी पडत आहोत. त्यांच्याशी आपला संवाद तुटल्याने, त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे आणि प्रश्नांचे निरसन न झाल्यानेच ते आंदोलनाचा मार्ग पत्करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आजची तरुण पिढी अत्यंत प्रामाणिक असून, मला डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा असेल, तर मी या नव्या पिढीवर नक्कीच ठेवेन, अशी पावती डॉ. मोहनजी भागवत यांनी तरुणाईला दिली. ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ च्या प्रतिनिधींसोबत नुकत्याच झालेल्या एका दिलखुलास संवादात त्यांनी विविध ज्वलंत व आधुनिक प्रश्नांवर संघाची भूमिका अतिशय परखडपणे मांडली. हा संवाद केवळ प्रश्नांची उत्तरे देणारा नव्हता, तर भरकटत चाललेल्या समाजाला सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भान देणारा ठरला.
पाश्चात्य प्रभावाखालील एलजीबीटीक्यू आणि समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर त्यांनी भारतीय संस्कृतीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, हा समुदाय आपल्याच समाजाचा भाग आहे आणि त्यांना सामावून घेण्याची आपली मोठी परंपरा आहे. मात्र, विवाह ही आपल्या संस्कृतीत केवळ एकत्र राहण्याची सोय नसून, ती एक पवित्र संस्था आहे, हे त्यांनी निक्षून सांगितले. कुटुंब व्यवस्था आणि पुढची पिढी घडवण्याचे कार्य याच विवाह संस्थेतून होते. त्यामुळे या पारंपरिक व्यवस्थेशी छेडछाड करणे योग्य नाही. या समुदायाला सामावून घेण्यासाठी समाजाने एखादा वेगळा कायदा किंवा व्यवस्था केल्यास हरकत नाही. परंतु, विवाहाचे मूळ स्वरूप बदलता येणार नाही, ही संघाची ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य
राष्ट्रनिर्माणात महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना, महिला आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आणि समान आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसारख्या सर्वोच्च निर्णय प्रक्रियेतही महिलांचा सहभाग कसा असतो, हे त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले. याशिवाय, पाकिस्तान आणि चीन संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. संघर्षाच्या किंवा युद्धाच्या काळात आपण पूर्णपणे आपल्या सरकार आणि सैन्यासोबत उभे राहिले पाहिजे. मात्र, दीर्घकालीन विचार केल्यास, कायमचा द्वेष हा कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही, असे सांगत डाॅ. मोहनजी भागवत यांनी भारतीय संस्कृतीच्या 'विश्वबंधुत्वाच्या' विचारांना उजाळा दिला.
आजच्या पिढीला तार्किक उत्तरे हवीत
तरुणांच्या आंदोलने आणि प्रश्नांबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले की, आजची पिढी प्रश्न विचारते कारण त्यांना तार्किक उत्तरे हवी असतात आणि संवादातूनच मार्ग निघू शकतो. तरुणाईच्या प्रामाणिकपणाचे आणि देशभक्तीचे कौतुक करत असतानाच, त्यांनी शिक्षणाच्या बाजारीकरणावर कडक प्रहार केला. शिक्षण हा व्यापार नाही, ती जीवनाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणासाठी केवळ सरकारवर विसंबून न राहता, समाजाने आपली जबाबदारी ओळखून शाळांच्या आणि शिक्षणाच्या विकासासाठी थेट सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक भेदभाव असेपर्यंत आरक्षण हवे
आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ विचारांची आठवण करून दिली. जोपर्यंत समाजात सामाजिक भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहायलाच हवे, असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला. मात्र, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यांनी मोठ्या मनाने ते सोडून समाजातील इतर वंचितांना संधी द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरक्षणासारख्या संवेदनशील सामाजिक उपायाचे राजकीय हत्यार बनवून समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी ताशेरे ओढले. तसेच, रोजगार आणि तरुणाईच्या मानसिकतेवर बोलताना, समाजात हाताने काम करणाऱ्याला प्रतिष्ठा राहिलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नोकरी म्हणजे केवळ पांढरपेशा जॉब न मानता, समाजात उद्योजकता आणि ‘श्रमप्रतिष्ठा’ रुजवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे डॉ. मोहनजी भागवत यानी सांगितले.
तरुणाईला समजून घेण्याचे आवाहन
ज्येष्ठ पिढीने नव्या पिढीवर केवळ टीका करण्याऐवजी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची गरज आहे. जर आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांना विश्वासात घेतले, तर त्यांच्यातील या प्रचंड ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यासाठी निश्चितच करता येईल. ही तरुण पिढीच भारताचे उज्ज्वल भविष्य असून, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आपले कर्तव्य असल्याचेही यातून अधोरेखित करण्यात आले आहे.