भारताच्या टप्प्यात आता संपूर्ण चीन

अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; चार हजार किमीची मारक क्षमता

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
चांदीपूर
Successful test of Agni-4 missile अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या सामर्थ्यात आणखी भर घालत, भारताने ‘अग्नी-४’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे गुरुवारी ओडिशामधील चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रावरून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले.संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राचे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक निकष यशस्वीपणे पडताळून पाहण्यात आले. ही चाचणी ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’द्वारे घेण्यात आली. ‘अग्नि-४’ हा भारताच्या ‘अग्नि’ क्षेपणास्त्र मालिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून, ते सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. चांदीपूर येथून घेण्यात आलेल्या या चाचणीदरम्यान, क्षेपणास्त्राने आपल्या निर्धारित मार्गाचे अनुसरण केले आणि सर्व निर्धारित निकष पूर्ण केले.
 
 
Successful test of Agni-4 missile
 
संरक्षण क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांनी ही चाचणी पूर्णत: यशस्वी ठरल्याचे घोषित केले आहे. ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या अंतर्गत घेण्यात आलेली ही चाचणी दर्शवते की, हे क्षेपणास्त्र आता प्रत्यक्ष लष्करी तैनातीसाठी सज्ज झाले आहे. याची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे. क्षेपणास्त्र प्रणालीची अचूकता, विश्वासार्हता आणि युद्धक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अशा चाचण्या नियमितपणे घेतल्या जातात. ‘अग्नि-४’ ची ही यशस्वी चाचणी भारताची अण्वस्त्रविषयक प्रतिबंधक क्षमता अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते.
अग्नी मालिकेचे महत्त्व
अग्नी क्षेपणास्त्र मालिका ही भारताच्या सामरिक संरचनेचा कणा आहे. अग्नी-१ ते अग्नी-५ अशा विविध क्षेपणास्त्रांची निर्मिती वेगवेगळ्या अंतरांवरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी करण्यात आली आहे. अग्नी-४ हे विशेषतः मध्यम पल्ल्याच्या लक्ष्यांसाठी विकसित केले गेले आहे. यात घन इंधन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे हे क्षेपणास्त्र त्वरित सज्ज करून डागणे शक्य होते. तसेच हे क्षेपणास्त्र रस्त्यांवरून सहजपणे ने-आण करता येणाऱ्या लाँचरवरून डागता येते. यामुळे त्याची गतिशीलता वाढते आणि शत्रूला त्याला लक्ष्य करणे कठीण जाते.