वर्धा,
super specialty sub district hospital ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना मोठी चालना देणाऱ्या तळेगाव (श्या.पंत) येथे उभारण्यात येणाऱ्या १५५.८४ कोटी खर्चाच्या ३०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन उद्या ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार अमर काळे, आ. सुमित वानखेडे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. अरुण लाखानी उपस्थित राहणार आहेत.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्यामुळे साकार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या रुग्णालयाची घोषणा केली होती. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक २५ एकर जागेला तातडीने मंजुरी देण्यात महसूल मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हे रुग्णालय महाराष्ट्रातील पहिले सुपर स्पेशालिटी उपजिल्हा रुग्णालय म्हणून विकसित करण्यात येत आहे. सुमारे २४ हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक रुग्णालयात उपजिल्हा स्तरावरच सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असेल. राज्य शासनाने जागतिक बँक समूहातील इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या रुग्णालयात अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रगत आयसीयू, पीआयसीयू, एचडीयू, स्वतंत्र ट्रॉमा व आपत्कालीन उपचार केंद्र, न्यूरो केअर युनिट, कार्डिओलॉजी विभाग, सीटी स्कॅनसह आधुनिक रेडिओलॉजी सुविधा, नेत्ररोग विभाग तसेच सर्वसमावेशक माता-बाल आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.
पाच वर्षांत नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालय : आ. वानखेडे
सुरुवातीला अत्याधुनिक आरोग्यसेवा सुरू करण्यात येतील. पुढील पाच वर्षांत नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून हा प्रकल्प सुमारे ७०० कोटींच्या सर्वसमावेशक मेडिकल कॅम्पसमध्ये विकसित केला जाईल. तळेगाव येथील रुग्णालयामुळे वर्धा व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच विशेष उपचार उपलब्ध होतील असे आ. सुमीत वानखेडे यांनी सांगितले.