चंद्रपूर
tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि एयरबीएनबी यांच्यात नागपूर येथील आयआयएम येथे सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश होमस्टे चालकांची डिजिटल सक्षमता वाढविणे, त्यांना अधिक दृष्यमानता मिळवून देणे, तसेच वाढत्या बाजारपेठेत त्यांना संधी मिळवून देणे हा असून, त्याद्वारे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होणार आहे.
tadoba सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये आणि परिसरात सुमारे 100 होमस्टे कार्यरत आहेत. या सामंजस्य कराराची देवाणघेवाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एम. श्रीनिवासा राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
tadoba या सामंजस्य कराराअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान आणि एयरबीएनबी यांच्या संयुक्त विद्यमाने होमस्टे तसेच बेड अँड ब्रेकफास्ट चालविणार्या यजमानांसाठी डिजिटल कौशल्य विकास, एयरबीनबी प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि क्षमता वृद्धीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या भागीदारीअंतर्गत एयरबीनबीवर नोंदणी, प्रोफाइल तयार करणे, छायाचित्रण, लिस्टिंग ऑप्टिमायझेशन, पाहुण्यांशी प्रभावी संवाद साधणे, तसेच आकर्षक आणि परिणामकारक मालमत्ता वर्णन तयार करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, देशातील इतर भागांतील होमस्टे व बेड अॅण्ड ब्रेकफास्ट संदर्भातील नियामक चौकट, सर्वोत्तम कार्यपद्धती आणि अनुभवांची देवाणघेवाणही केली जाणार असून, महाराष्ट्रातील समुदाय-आधारित पर्यटनासाठी धोरणात्मक आणि कार्यात्मक परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी तोडाबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळणार आहे.
tadoba या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 30 होमस्टेची क्षमता वृद्धी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत 10 आणि 11 जुलै 2026 रोजी पहिल्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला होमस्टे चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे आतापर्यंत 15 होमस्टे एयरबीएनबी प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत झाले असून, उर्वरित होमस्टे आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.