नवी दिल्ली,
Team India fails in Lanka श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी सुरू असलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांना तब्बल ३६ षटकांपर्यंत एकही विकेट मिळवता आली नाही. श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत १६६ धावांपर्यंत मजल मारली. भारताला मिळालेले एकमेव यश निशान मदुष्काच्या ६६ धावांवर झालेल्या धावबादच्या रूपाने मिळाले.भारतीय गोलंदाजीची धार या सामन्यात पूर्णपणे बोथट झाल्याचे दिसून आले. मोहम्मद सिराजने ९ षटकांत ३० धावा दिल्या, मात्र त्याला विकेट मिळाली नाही. प्रसिद्ध कृष्णाने ५ षटकांत २७, तर गुरनूर ब्रारने ४ षटकांत २५ धावा दिल्या. फिरकीपटूंनाही प्रभाव पाडता आला नाही. रवींद्र जडेजाने ८.१ षटकांत ४० धावा दिल्या, तर कुलदीप यादवने ५ षटकांत २३ धावा खर्च केल्या. मानव सुथारने ५ षटकांत १४ धावा देत तुलनेने किफायतशीर गोलंदाजी केली, पण त्यालाही बळी मिळवता आला नाही.
गोलंदाजांच्या अपयशाला क्षेत्ररक्षणातील चुकांचीही जोड मिळाली. श्रीलंकेच्या रवींदू रसंथाला भारतीय खेळाडूंनी दोनदा जीवदान दिले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ४४ धावांवर असताना कर्णधार केएल राहुलने त्याचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू हातातून निसटला. त्यानंतर सिली पॉइंटवर देवदत्त पडिक्कलनेही रसंथाचा झेल सोडला. या दोन चुका भारतासाठी महागात पडल्या.जीवदान मिळाल्यानंतर रसंथाने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. त्याने १०६ चेंडूंचा सामना करत ५९ धावांवर नाबाद राहत श्रीलंकेचा डाव मजबूत केला. त्याला पसिंदू सूर्यबंदराने चांगली साथ देत ४६ चेंडूंत ३३ धावा केल्या. श्रीलंकेच्या फलंदाजांनी सुमारे ४.५९च्या धावगतीने धावा जमवत भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यातील ही कामगिरी भारतीय संघासाठी नक्कीच चिंतेची बाब ठरली आहे. गोलंदाजांना विकेट मिळत नसणे, क्षेत्ररक्षणात सोपे झेल सुटणे आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना सहज धावा करू देणे, या तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाला सुधारणा करण्याची गरज आहे. गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील टीम इंडियासमोर आता सराव सामन्यातील चुका दूर करून कसोटी मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचे आव्हान आहे.