बँकॉक,
Thailand school shooting थायलंडची राजधानी बँकॉकच्या उत्तरेकडील नोनथाबुरी प्रांतातील एका शाळेत शुक्रवारी, ७ ऑगस्ट २०२६ रोजी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षकावर गोळी झाडल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार एक शिक्षक आणि संबंधित विद्यार्थी मृत्युमुखी पडले असून, किमान १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यम थाई पीबीएसच्या वृत्तानुसार, या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.नोनथाबुरी प्रांतातील बँग क्रुआई जिल्ह्यातील एका नामांकित हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची अधिक माहिती आणि मृतांचा नेमका तपशील प्रशासनाकडून समोर येणे बाकी आहे.
थायलंडचे शिक्षण मंत्री प्रसेर्ट चंतारुआंगथोंग यांनी घटनेनंतर तातडीने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासोबतच बाधित व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे तातडीने मूल्यांकन करून त्यांना आवश्यक मदत देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.दरम्यान, घटनेशी संबंधित संवेदनशील छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. अशा माहितीमुळे मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेवर तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी शोक व्यक्त केला. थायलंडमध्ये बंदुका बाळगण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे सांगितले जाते. देशात सुमारे १ कोटी बंदुका वापरात असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच प्रत्येक सात रहिवाशांमागे जवळपास एक बंदूक असल्याचे या आकडेवारीतून दिसते.