वेध
रेवती जोशी-अंधारे
९२२३७००२७७
science of tetrachromacy पुलंच्या "बटाट्याची चाळ' मधील साडी खरेदीचा प्रसंग ! रामा ग्रीन, कांद्याच्या सालीच्या रंगाची शेड, डाळिंबी लाल, किरमिजी, सी ब्ल्यू अशा अशक्य रंगांच्या साड्या दाखविण्याचा आग्रह धरणारी सौ आणि स्थितप्रज्ञतेने साड्या दाखविणारा दुकानदार ! या सगळ्यात बावचळलेला नवरा! हिरवा तो हिरवा, लाल तो लाल आणि कांद्याच्या सालीला कुठला आलाय रंग, हे नवऱ्याचे प्रांजळ मत! त्यांच्यातील संवाद आणि दुकानातील प्रसंग पुलंच्या मिश्किल लेखनाने अजरामर झाला आहे. चोखंदळपणे रंगांची निवड हा केवळ बायकी स्वभाव नव्हे तर महिलांना निसर्गदत्त लाभलेले ‘सुपर सायन्स’ आहे, हे नव्या संशोधनाने सिद्ध केले आहे.

पुरुषांचे ट्रायक्रोमॅटिक जग विरुद्ध स्त्रियांचे टेट्राक्रोमॅटिक साम्राज्य! सामान्य माणसाच्या डोळ्यात रंग ओळखणाऱ्या तीन प्रकारच्या पेशी असतात. लाल, हिरवा आणि निळा! याला ट्रायक्रोमसी म्हणतात. या तीन पेशींच्या बळावर सामान्य पुरुष साधारणपणे १० लाख रंग पाहू शकतो. पुरुषासाठी टोमॅटो सॉसचा लाल, रक्ताचा लाल आणि मिरचीचा लाल हा शेवटी फक्त लालच असतो. पण निसर्गाने महिलांना एक देणगी दिली आहे. साधारण ६० टक्के महिलांच्या डोळ्यांत जनुकीय रचनेमुळे चौथी अतिरिक्तरंगपेशी विकसित होते. या स्थितीला म्हणतात टेट्राक्रोमसी! ज्यामुळे महिलांना तब्बल १० कोटी रंग दिसतात आणि ओळखू येतात. या कौशल्यामुळेच बायकांना पुरुषमंडळी थेट ‘कलर ब्लाईंड’ वाटतात.
आता विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिले तर पत्नीचे म्हणणे अगदी बरोबर होते. पतीच्या डोळ्यांना जी साडी फक्त हिरवी दिसते, त्याच साडीमध्ये त्यांच्या टेट्राक्रोमॅट पत्नीला पिवळसर-हिरवी, निळसर-हिरवी आणि रामा-ग्रीन अशा छटा दिसतात. असाच प्रकार कांद्याच्या सालीच्या रंगाचा आहे. कांद्याच्या वाळलेल्य पापुद्र्यामध्ये राखाडी, गुलाबी, फिकट तपकिरी आणि जांभळ्या रंगांचे शेकडो सूक्ष्म फरक महिला पाहू शकतात. पुलंचे निरीक्षण इतके अफाट होते की, विज्ञानाने शोधण्यापूर्वीच स्त्रियांच्या या विशेष दृष्टीची नस अचूक पकडली होती.
हे प्रामुख्याने महिलांमध्येच का आढळते? तर मानवी शरीरात रंगांची दृष्टी देणारे जीन्स हे क्रोमोझोमवर अवलंबून असतात. पुरुषांकडे एक तर महिलांकडे दोन क्रोमोझोम असतात. जर महिलांच्या दोन्ही क्रोमोझोम्समधील जीन्समध्ये विशिष्ट जनुकीय बदल झाले, तर त्यांच्या डोळ्यांत चार प्रकारच्या रंगपेशी विकसित होतात. जगभरातील सुमारे १२ ते १५ टक्के महिलांच्या जनुकीय रचनेत चार रंगपेशी असण्याचे संकेत मिळतात. महिलांचे मेंदू या चौथ्या पेशीचा वापर करून प्रत्यक्षात कोट्यवधी रंग पाहू शकतात. याला फंक्शनल टेट्राक्रोमसी म्हणतात. टेट्राक्रोमॅट व्यक्तीला दोन सारख्याच दिसणाऱ्या रंगांमधील अतिसूक्ष्म फरक सहज दिसतात. बहुतांश महिलांना त्यांच्यातील या कौशल्याविषयी माहिती नसल्यामुळे त्या याचा प्रभावी वापर करू शकत नाहीत. ट्यूबलाईटचा प्रकाश, बल्बचा प्रकाश आणि सूर्यप्रकाशानुसार रंगांच्या छटा बदलताना त्यांना स्पष्ट जाणवतात. वेगवेगळ्या प्रकाशात रंगांच्या लहरी बदलतात.science of tetrachromacy एक सामान्य पुरुष दोन्ही प्रकाशात तोच रंग तसाच पाहतो. पण, स्त्रियांचे डोळे प्रकाशातील हा सूक्ष्म बदल लगेच टिपतात. म्हणूनच साडी किंवा कपडा सूर्यप्रकाशात नेऊन तपासला जातो. केवळ कपडेच नाही तर खाद्यपदार्थ, मेक-अपच्या विविध वस्तूंचे शेड्स, झाडं-फुलं, गाड्या-प्राणी यांच्यातील रंगवैविध्यही महिलांना अचूकतेने उमगते.
महिलांकडे रंग ओळखणारी जास्तीची रंगपेशी असल्यामुळे त्यांना असे काही रंग दिसू शकतात ज्यांचे शब्दांत वर्णन करणे अशक्य असते आणि म्हणून त्या विशिष्ट रंगाच्या जवळपास असलेल्या वस्तूंचा उल्लेख करून तो रंग समजावून सांगताना कांद्याच्या सालीसारखी मजेदार उदाहरणं दिली जातात. एखादी व्यक्ती नक्की कोणते रंग बघते किंवा त्यांना ते कसे दिसतात? हे मोजण्याची एकच सरसकट शास्त्रोक्त पद्धत नाही. फंक्शनल टेट्राक्रोमसी समजून घेऊन, स्वत:मध्ये त्या कौशल्याचा विकास करण्याची क्षमताही महिलांमध्ये आढळते. फंक्शनल टेट्राक्रोमसी खरंच असते की नाही? यावर संशोधकांमध्ये मतभेद असून त्यावर संशोधन सुरू आहे. यावर कोणतीही अचूक वैज्ञानिक चाचणी उपलब्ध होईपर्यंत वेगवेगळ्या प्रयोग आणि अभ्यासांतून मिळणाऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढला जातो. पुढच्या वेळी खरेदी करताना,‘हा हिरवा जरा जास्त पिवळट आहे’ किंवा ‘मोतिया रंगात आसमानी शेड हवा’, अशी वाक्यं ऐकू आली तर आदराने त्यांच्याकडे पाहा! समोर उभी असलेली स्त्री ही निसर्गाची एक ‘सुपर ह्युमन’ आवृत्ती असू शकते, जिच्याकडे जगातील १०० कोटी रंग पाहण्याची दैवी दृष्टी आहे. महिलांनी रंगांच्या ‘शेड’ची ‘छेड’ काढली, तर विज्ञानाचा हा नियम नक्की आठवा!