चंद्रपूर,
ashram school बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथील एका प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात 7 आणि 11 वर्षाच्या दोन अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 जुलै रोजी घडलेल्या या भीषण प्रकाराचा उलगडा 3 ऑगस्ट रोजी झाला. या घटनेची गंभीर दखल घेत आश्रमशाळा व्यवस्थापनाने प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यांना 5 ऑगस्ट रोजी निलंबित केले आहे.
पीडित विद्यार्थ्यांनी आश्रम शाळेच्याच अन्य विद्यार्थ्यांनी हा अत्याचार केल्याची माहिती सुरुवातीला मुख्याध्यापक यांना दिली होती. मात्र, त्यांनी मदत करण्याऐवजी 11 वर्षीय तक्रारदार बालकालाच मारहाण करीत, ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली असा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, 7 वर्षांच्या लहान बालकाला सतत रक्तस्त्राव आणि शारीरिक त्रास सुरू झाल्याने त्याला प्रथम बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलाच्या 13, तर मोठ्या मुलाच्या 3 शिरांना गंभीर दुखापत झाली आहे.ashram school संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक हेही सर्व तितकेच दोषी असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी पीडितांच्या पालकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एका स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आश्रमशाळेचे संचालक पंकज पवार यांनी दिली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे, महिला पोलिस उपनिरीक्षक करिश्मा मोरे यांच्या विशेष पथकाने 4 ऑगस्टच्या रात्रीच कारवा येथील आश्रमशाळेत जाऊन सखोल तपासाला सुरुवात केली. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गुन्हा दाखल, दोन विधिसंघर्ष बालक ताब्यात
2 बालकांवरील अनैसर्गिक अत्याचाराच्या प्रकरणात बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात 2 विधिसंघर्ष बालकांचे नाव आल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत आश्रमशाळेतील एकूण 35 विद्यार्थ्यांची साक्ष नोंदविण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी असा प्रकार घडला आहे का याचीदेखील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली.