हिंगणघाट,
municipal council primary school नगरपरिषदेने आपल्या अर्थसंकल्पात शिक्षणावर जास्त खर्च करून न. प. प्राथमिक शाळांचा दर्जा वाढवा असे आवाहन आ. समीर कुणावार यांनी केले. हिंगणघाट न.प.च्या सभागृहात नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं, गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, न.प. उपाध्यक्ष नीलेश ठोंबरे, महिला व बाल कल्याण विभागाच्या उपसभापती अश्विनी मानेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक किशोर दिघे यांची उपस्थिती होती.

आ. कुणावार पुढे म्हणाले की, न. प. शाळांचा दर्जा वाढवून शाळांची पटसंख्या वाढवण्यावर भर द्या, अंगणवाडीच्या भिंती बोलक्या करा. नगराध्यक्ष डॉ. तुळसकर म्हणाल्या की, नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर १५ लाख रुपये तरतूद होती. आता ती वाढवून २५ लाख करण्यात आली आहे. असा हा उपक्रम राबवणारी जिल्ह्यात आपली नगरपरिषद पहिलीच असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. वय वर्ष ३ ते ७ या वयोगटात विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढणे गरजेचे असते त्या दृष्टीने हा प्रयत्न असून शिक्षणाचा दर्जा वाढवणार, भरपूर चांगले बदल होणार व हिंगणघाट एक उत्कृष्ट मॉडेल बनवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाबद्दल ॲड. सुधीर कोठारी यांनी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांचे कौतुक केले. न.प. उपाध्यक्ष नीलेश ठोंबरे यांनी ५४ अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना सूचना देण्याची आ. कुणावार यांना केलेली विनंती कोठारी यांनी उचलून धरली. याची र्ही ओढत आ. कुणावार व नगराध्यक्ष डॉ. तुळसकर यांनी ही बाब उचलून त्यावर शिक्कामोर्तब केले.
बारामतीनंतर हिंगणघाटात
महाराष्ट्रात बारामतीनंतर हिंगणघाट नगरपरिषद ही संकेतस्थळ बनविणारी दुसरीच नगरपरिषद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.