पाटणा,
Violence erupts in Patna पाटणा बायपास पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातानंतर संतप्त जमावाने मोठा गोंधळ घातला. भरधाव बसच्या धडकेत २६ वर्षीय मनीष कुमार याचा जागीच मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि मृताच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर जमावाने महामार्गावर वाहतूक रोखून धरली आणि परिस्थिती काही वेळातच हिंसक बनली.अपघातग्रस्त बसला जमावाने घेराव घालत पेटवून दिले. त्यानंतर परिसरात उभी असलेली आणखी चार ते पाच वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते; मात्र संतप्त जमावाच्या विरोधामुळे त्यांना कारवाई करता आली नाही आणि माघारी परतावे लागले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिस अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती बिघडल्याने पोलिसांना काही काळ माघार घ्यावी लागली. या हिंसाचारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी अतिरिक्त फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांकडून अपघातामागील कारणांचा तपास सुरू असून हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.