मुंबई,
spider man टॉम हॉलंडच्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर आठव्या दिवशीही आपली पकड कायम ठेवली आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून, भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत मोठी झेप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत ३०० कोटी रुपयांचा टप्पा गाठणारा हा सर्वात वेगवान हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कमाईवर नजर टाकल्यास, पहिल्या दिवशी ६०.६० कोटी रुपये मिळाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४९.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ७०.२५ कोटी, चौथ्या दिवशी ७७.७५ कोटी, पाचव्या दिवशी २३.८० कोटी, सहाव्या दिवशी २१.७५ कोटी आणि सातव्या दिवशी १७ कोटी रुपयांची कमाई झाली.

आठव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली असली, तरी त्याचा बॉक्स ऑफिसवरील प्रभाव कायम आहे. आता या चित्रपटासमोर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम’चा विक्रम मोडण्याचे आव्हान आहे. ‘एंडगेम’ने भारतात ३७३.२२ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा आकडा पार करण्यासाठी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ला आणखी ४३ कोटी रुपये कमवावे लागणार आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाच्या कमाईला पुन्हा वेग मिळाल्यास हा टप्पा गाठण्याची शक्यता वाढणार आहे. मात्र, भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट होण्यासाठी त्याला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या कमाईलाही मागे टाकावे लागेल. त्यासाठी चित्रपटाला सध्याच्या कमाईपेक्षा सुमारे ६० कोटी रुपये अधिक कमवावे लागणार आहेत.