विवाहबाह्य संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पत्नीचा गळा आवळून खून

पतीसह सासू-सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
कारंजा लाड,
washim murder case विवाहबाह्य संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पतीने सासू - सासर्‍यांच्या संगनमताने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे घडल्याचे पोलिसांच्या विशेष अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी ७ ऑगस्ट रोजी कारंजा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव दिपाली ज्ञानेश्वर मदने (वय २५), रा. शिवनगर, ता. कारंजा, असे आहे. तर आरोपींमध्ये पती ज्ञानेश्वर नंदू मदने (वय २८), सासरे नंदू गोविंदराव मदने (वय ५२) आणि सासू पद्मिना नंदू मदने (वय ४७) यांचा समावेश आहे.
 
 

washim murder case 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास शिवनगर येथील राहत्या घरी दिपाली हिचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. पती ज्ञानेश्वर याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याने त्या संबंधातील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच दिपाली हिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.washim murder case या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. याप्रकरणी मृत दिपालीचा भाऊ राहुल अनिल माने (वय २८) यांच्या जबानी रिपोर्टवरून गुन्हा क्रमांक ५१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ८५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी पती ज्ञानेश्वर मदने याला ७ ऑगस्ट रोजी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे व पोलिस निरीक्षक अमर चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजीत बारे करीत आहेत. पोलिसांच्या तपासातून घटनेमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि विवाहबाह्य संबंधासंदर्भातील आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.