मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण!

सहप्रवाशांच्या शांततेने संताप

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Woman assaulted in Mumbai local train मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला पुरुष प्रवाशाने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुरुषांच्या डब्यात घडलेल्या या प्रकारामुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, महिला मारहाणीचा सामना करत असताना आजूबाजूला बसलेल्या सहप्रवाशांनी हस्तक्षेप केला नसल्याचे व्हिडीओत दिसत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला लोकलच्या पुरुषांच्या डब्यातील आसनावर झोपली होती. यावरून तिचा संबंधित पुरुष प्रवाशासोबत वाद झाला. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. एवढेच नव्हे, तर त्याने कमरेचा पट्टा काढून महिलेला धमकावल्याचेही सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारावेळी डब्यात अनेक प्रवासी उपस्थित होते, मात्र कोणीही त्या पुरुषाला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.
 
 

Woman assaulted in Mumbai local train 
हा प्रकार नेमक्या कोणत्या लोकलमध्ये आणि कोणत्या स्थानकादरम्यान घडला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप आल्याच्या वृत्तामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. महिलांच्या डब्यात साप दिसल्याचे समजल्यानंतर काही महिला प्रवाशांनी अलार्म चेन ओढल्याने लोकल थांबवण्यात आली. सकाळी ९.१४ ते ९.२६ या कालावधीत लोकल सुमारे १२ मिनिटे थांबली होती.
 
 
ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून लोकल रवाना झाल्यानंतर हा प्रकार घडला. माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलांच्या डब्याची तपासणी केली. तपासणीनंतर डब्यात कोणताही धोका नसल्याची खात्री करून लोकल पुढे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तपासणीत काहीही आढळले नाही. साप प्रत्यक्षात डब्यात होता की नाही, याबाबत रेल्वेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.