अनिल कांबळे
नागपूर,
worker dies in gas cylinder explosion यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फॅब्रिकेशन कारखान्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन कामगाराचा मृत्यू झाला. कारखाना मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, वांजरी नाका क्रमांक २ रोड, रहमतनगर येथील अन्सारी फॅब्रिकेशन कारखान्यात सईद अहमद वकील अहमद अन्सारी (५०, आझादनगर, टेका) हे गुरूवारी वेल्डिंगचे काम करत होते.

काम करत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तपासादरम्यान, कारखाना मालक अब्दुल कयुम अन्सारी (५५, फारूकनगर) याला गॅस वेल्डिंगची टॉर्च खराब असून त्यातून गॅस लिकेज होत असल्याची पूर्ण कल्पना होती. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे माहीत असूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मालकाच्या या निष्काळजीपणामुळेच सईद अहमद यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत कामगाराचे भाऊ तुफेल अहमद अन्सारी (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी कारखाना मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.