मुंबई
Bank of Baroda बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या २०६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. डिजिटल बँकिंग, माहिती सुरक्षा, सुरक्षा, एंटरप्रायझेस डेटा मॅनेजमेंट ऑफिस, कॉर्पोरेट अकाउंट्स अँड टॅक्सेशन प्लॅनिंग तसेच फॅसिलिटी मॅनेजमेंट यांसह विविध विभागांमध्ये नियमित नियुक्त्यांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून २६ ऑगस्ट २०२६पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या भरती मोहिमेत स्पेशलिस्ट ऑफिसरची एकूण २०६ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, प्रॉडक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, सिक्युरिटी मॅनेजर तसेच टॅक्सेशनशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२६पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, संबंधित कामाचा अनुभव आणि वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध संबंधित पदाची पात्रता आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची गणना १ ऑगस्ट २०२६ या तारखेच्या आधारावर केली जाणार आहे.अर्ज शुल्क उमेदवारांच्या प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये तसेच पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. या शुल्काव्यतिरिक्त पेमेंट गेटवे शुल्क लागू राहणार आहे. अर्ज शुल्काचा भरणा केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
अर्जांची छाननी
बँक ऑफ बडोदाच्या माहितीनुसार, निवड प्रक्रियेत सर्वप्रथम प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. आवश्यकतेनुसार ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊ शकते. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीचे आयोजन केले जाऊ शकते. अंतिम निवडीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्यास त्यामध्ये एकूण १५० प्रश्न असतील आणि त्यासाठी २२५ गुण निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा असेल. प्रश्नपत्रिकेत रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाला ०.२५ गुणांची नकारात्मक गुणांकन पद्धत लागू असेल.नियमित पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या निर्धारित अटींनुसार सर्व्हिस बॉन्डही भरावा लागणार आहे. ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I मधील अधिकाऱ्यांना किमान तीन वर्षे सेवा देणे बंधनकारक असेल. निर्धारित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडल्यास बँकेच्या नियमांनुसार दंड भरावा लागू शकतो. त्याचप्रमाणे मिडल आणि सीनियर मॅनेजमेंट ग्रेडमधील अधिकाऱ्यांनाही निर्धारित मर्यादेनुसार सर्व्हिस बॉन्डच्या अटी लागू राहणार आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर होम पेजवरील करिअर विभागात जाऊन ‘करंट ऑपर्च्युनिटीज’ या पर्यायावर क्लिक करावे. संबंधित भरतीची अधिसूचना निवडल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट प्रत भविष्यातील उपयोगासाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
या भरतीमुळे बँकिंग क्षेत्रातील विविध विशेषज्ञ विभागांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र उमेदवारांना नियमित नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर सर्व अटी अधिकृत अधिसूचनेनुसार तपासूनच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.