पावसाचा ‘ब्रेक’ की वादळापूर्वीची शांतता? १५ ऑगस्टनंतर महाराष्ट्र पुन्हा भिजणार

    दिनांक :08-Aug-2026
Total Views |
मुंबई
maharashtra rain update  जुलै महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने राज्यभरात अक्षरशः कहर केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक भागांमध्ये नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर बहुतांश धरणांनीही आपली मर्यादा पातळी ओलांडली. राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाबाबत हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत राज्यात पावसाचा ब्रेक राहण्याची शक्यता आहे. मात्र, १५ ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
 

maharashtra rain update 
दरम्यान, ‘एल निनो’चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत देशभरात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाच्या स्थितीचा विचार करून प्रशासनाने त्यानुसार नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनीही १५ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. मात्र, १५ ऑगस्टनंतर राज्यभरात पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 मध्यम एल निनो
 
 
सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर ‘मध्यम एल निनो’ परिस्थिती आहे. मान्सूनच्या उर्वरित काळात ही परिस्थिती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही अथ्रेय शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तळकोकणात समाधानकारक maharashtra rain update  पाऊस झाल्याने भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीची लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. आतापर्यंत ४८ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड पूर्ण झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत सरासरी ७४ टक्के पाऊस झाला असून, शेतीसाठी झालेला पाऊस पूरक ठरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.
 
 
 
मात्र, तळकोकणात अधूनमधून हलक्या सरी कोसळत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरण ८३.८२ टक्के भरले आहे. धरणातून ७३९४ क्युसेक वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १४ लहान-मोठी धरणे भरून ओसंडून वाहत आहेत, तर जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ७८.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
लातूर जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर ग्रामीण, औसा आणि निलंगा आदी तालुक्यांमध्ये पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पेरणी झालेल्या पिकांची वाढही जोमाने होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मात्र, पिकांसाठी लाभदायक ठरलेला हा पाऊस जलसाठ्याच्या दृष्टीने अद्याप समाधानकारक ठरलेला नाही. लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्प आणि १३५ लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १३.६९ टक्के पाणीसाठा आहे. मागील दोन दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांच्या साठ्यात विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे आणि प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, आगामी काळात दमदार पावसाची गरज कायम आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड आणि दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने पुणे वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वेगवेगळी असली तरी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी होण्याचा आणि त्यानंतर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकीकडे पिकांना मिळालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना, दुसरीकडे जलसाठ्यांची स्थिती, संभाव्य मुसळधार पाऊस आणि ‘एल निनो’चा प्रभाव लक्षात घेता प्रशासनासमोर पुढील काळाचे नियोजन करण्याचे आव्हान कायम आहे.