नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफच्या नियमांत मोठे बदल

    दिनांक :08-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Major changes to PF rules नोकरदार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजेच ईपीएफओचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीएफमधून पैसे काढणे, दाव्यांची पूर्तता आणि ई-नॉमिनेशन यासंदर्भातील प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, त्यामुळे सदस्यांनी आपल्या पीएफ खात्यातील माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.नव्या नियमांनुसार पीएफ खात्यातील आवश्यक माहिती अपूर्ण असल्यास किंवा ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास दाव्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. पीएफ काढताना होणारा विलंब, दावे नाकारले जाण्याचे प्रमाण आणि गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या काटेकोर करण्यावर भर देण्यात आला आहे.
 
 
aaie
 
पीएफ योगदानाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफसाठी जमा केली जाते. सध्या १५ हजार रुपयांच्या मासिक वेतनापर्यंत पीएफ योगदानाची अनिवार्य मर्यादा लागू आहे. त्यानुसार जास्तीत जास्त १,८०० रुपयांचे वैधानिक योगदान होते. १५ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त योगदान ऐच्छिक असू शकते. आता ही वेतनमर्यादा केंद्र सरकारच्या अधिसूचनेशी जोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.पीएफमधून पैसे काढण्याच्या विविध श्रेणी कमी करून त्या तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक गरजा, कौटुंबिक गरजा आणि विशेष परिस्थिती यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सदस्यांना कोणत्या कारणासाठी पीएफमधून रक्कम काढता येईल, हे समजणे अधिक सोपे होणार आहे.
 
 
 
आंशिक पीएफ काढताना सदस्यांना त्यांच्या खात्यातील शिलकीपैकी जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कम काढता येईल. उर्वरित किमान २५ टक्के रक्कम निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी खात्यात ठेवण्याची अट असल्याचे सांगण्यात आले आहे.वैद्यकीय खर्चासह काही कारणांसाठी पीएफमधून रक्कम काढायची असल्यास किमान १२ महिने नोकरी पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण पीएफ काढण्याच्या नियमातही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पूर्वी सलग दोन महिने बेरोजगार राहिल्यानंतर संपूर्ण पीएफ काढण्याची सुविधा होती; नव्या नियमानुसार संपूर्ण रक्कम काढण्यासाठी १२ महिने बेरोजगार राहण्याची अट असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
दरम्यान, पीएफ खात्यात वारसदाराची नोंद करण्याची ई-नॉमिनेशन प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. कागदी अर्जाऐवजी डिजिटल माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. भविष्यात खातेदाराच्या कुटुंबीयांना पीएफ किंवा पेन्शनशी संबंधित लाभ मिळवताना अडचणी येऊ नयेत, यासाठी ई-नॉमिनेशन पूर्ण करून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. दाव्यांच्या पूर्ततेबाबतही ईपीएफओसाठी २० दिवसांची मुदत निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. वैध माहिती उपलब्ध असूनही दाव्याच्या निपटाऱ्यात विलंब झाल्यास १२ टक्के दराने दंडात्मक व्याज देण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित पीएफ आयुक्तांच्या वेतनातून वसूल करण्याची तरतूदही नमूद करण्यात आली आहे. पीएफ काढण्याचा विचार करणाऱ्या सदस्यांनी आपल्या खात्यातील वैयक्तिक माहिती, वारसदाराची नोंद आणि इतर आवश्यक तपशील अद्ययावत आहेत की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक ठरणार आहे. विविध परिस्थितींमध्ये पात्रतेच्या अटी वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे दावा करण्यापूर्वी लागू नियम तपासणे महत्त्वाचे आहे.