नवी दिल्ली,
woman killed after being hit दिल्लीतील नरेला परिसरात शनिवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. मामूरपूर येथील हिमालय अपार्टमेंट्ससमोर भरधाव मर्सिडीज-बेंझ कारने अनेक वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ७० वर्षीय उर्मिला यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून इतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजता मामूरपूरच्या मुख्य रस्त्यावर मर्सिडीज-बेंझ आणि वॅगनआर कारची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर वॅगनआरचे नियंत्रण सुटले आणि ती मागे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन चाकी मालवाहू वाहनावर आदळली. याचवेळी नरेला येथील मामूरपूर भागातील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय उर्मिला या वाहनांच्या धडकेत सापडल्या.
वाहनांमध्ये अडकल्याने उर्मिला यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघातामागील नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. मर्सिडीजचा वेग किती होता, तसेच अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. अपघातातील वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार मर्सिडीज कारचा चालक हा वाहनाचा मालक नसून त्याने मित्राकडून कार घेतली होती. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ शांतता होती.