राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

प्रशांत किशोरांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण

    दिनांक :08-Aug-2026
Total Views |
मुंबई
ncp राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली असून, पक्षाचे नेते आणि वरिष्ठ वर्तुळातील नाराजीचा सूर अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. अजितदादांनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच आता रणनीतीकार प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याच्या चर्चेने वादाला तोंड फुटले आहे. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांची खदखद सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असून, रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे घेत पुन्हा आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे माध्यमांशी बोलताना संयमाची भूमिका मांडली.
 

ncp internal rift: chhagan bhujbal reacts to prashant kishor appointment buzz and sunil tatkare row 
प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी या भेटीला राजकीय नियुक्तीशी जोडणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. “ते भेटले असतील. ते कधी आम्हालाही भेटतात. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार होऊन त्यांची नियुक्ती झाली असे मला वाटत नाही,” असे भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार मंत्री आहेत, त्यांना प्रशांत किशोर येऊन भेटले आणि चर्चा केली, यात काहीही वावगे नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या भेटीच्या वेळी खासदार पार्थ पवारही उपस्थित होते.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सध्या दिल्लीत अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन सुरू असल्याने मुंबईतील देवगिरी तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या बैठकींना त्यांना उपस्थित राहता आले नसावे, असे ते म्हणाले. “माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यात ते भेटले आणि चर्चा पण कदाचित झाली आहे. फोनवर सुद्धा एखाद्या गोष्टीची चर्चा होते. एवढं काही सिरीयस घेण्याचं कारण आहे, असं मला वाटत नाही,” अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबतही भुजबळ यांनी पक्षातील सर्व नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. “ठीक आहे, सर्वांनी शांततेत घेतले पाहिजे. अजित दादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पश्चात पक्ष सांभाळायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांना सांभाळायचे आहे. अधिक ताकद आपण कशी मिळवू, ते आपल्याला पाहायचे आहे. सावकाशीने सगळ्यांनी घ्यावे,” असे त्यांनी सांगितले.अजितदादांवर प्रेम असल्यामुळेच आम्ही सर्व पवार साहेबांना सोडून इकडे आलो होतो, असे सांगत भुजबळ यांनी पक्षातील मतभेदांकडेही वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. दादांच्या कुटुंबियांना त्रास होईल असे वातावरण निर्माण करण्यात आल्याच्या उमेश पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना “अजित दादांवर प्रेम होतं की नव्हतं, असे कोणाबद्दल बोलतात हे स्पष्ट नाही,” असे भुजबळ म्हणाले. आपल्या घरातही मतभेद होतात, मग हा तर पक्ष आहे, असे सांगत त्यांनी पक्षातील प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची गरज अधोरेखित केली. “आपला हा येवला आहे, छोटासा मतदारसंघ. यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही? सगळ्यांना बरोबर घेऊन जावे लागते,” असेही त्यांनी नमूद केले.
प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. त्यावरही भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. “ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. शेवटी त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. सुनेत्राताई पवार यांना कोणाला भेटायचं, कोणाला नाही भेटायचं, त्या ठरवतील. आमच्या परवानगीची गरज नाही,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या भेटीच्या चर्चेपासून सुनील तटकरे यांच्यावरील आरोपांपर्यंत आणि नेत्यांच्या सोशल मीडिया प्रतिक्रियांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद अधिक चिघळू न देता सर्वांनी संयमाने परिस्थिती हाताळावी, अशीच भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.