मुंबई वार्तापत्र. . .
नागेश दाचेवार
dr mohanji bhagwat सकाळ झाली की उठसूठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपवर वाक्बाण सोडल्याशिवाय ‘उबाठा’ गटाचे पोट भरत नाही. ‘उबाठा’ म्हणजे काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आणि वैचारिक दिवाळखोरीची उबळ आलेली एक राजकीय लावणीच झाली आहे. नुकतेच भाजपची आई सध्या काय करते? असा उथळ आणि बालिश सवाल करत, सरसंघचालकांच्या ‘जेन-झी’ तरुणाईसोबतच्या संवादावर आगपाखड करण्यात आली. पण, ज्यांनी केवळ सत्तेच्या लाचारीसाठी हिंदुत्वाच्या विचारांची राखरांगोळी केली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चरणी लोटांगण घातले, त्यांनी संघासारख्या राष्ट्रभक्त संस्थेला प्रश्न विचारणे, म्हणजे ‘सत्तर उंदीर खाऊन बोका गेला काशीला’ असाच हास्यास्पद प्रकार आहे!
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी तरुण पिढीशी, म्हणजेच ‘जेन-झी’शी संवाद साधण्याचे ठरवले, तर उबाठा गटाच्या पोटात मळमळ का सुरू झाली? संघ हा सुरुवातीपासूनच समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः तरुणाईला राष्ट्रवादाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आजची तरुणाई भरकटू नये, ‘तुकडे-तुकडे गँग’च्या आणि डाव्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांनी देशविघातक कारवायांमध्ये ओढले जाऊ नये, यासाठी जर संघ त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत असेल, तर त्यात वावगे काय? पण, ज्यांचा पक्षच आता वैचारिक ‘केमिकल लोचा’चा शिकार झाला आहे, त्यांना संवादाचे आणि सुसंस्कारांचे महत्त्व कसे समजणार? ज्यांना अर्बन नक्षलवाद्यांचा आणि आंदोलक-अराजकवाद्यांचा उदोउदो करायचा आहे, त्यांना संघाच्या राष्ट्रभक्तीचा विचार झोंबणार हे उघडच आहे.
ज्या जंतरमंतर आंदोलनाचा हवाला देऊन आज हे लोक अश्रू ढाळत आहेत, त्या आंदोलनामागे कोणत्या आंतरराष्ट्रीय आणि डाव्या शक्ती कार्यरत होत्या, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. भारतात लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून रस्त्यावर उतरून अराजकता निर्माण करायची, विदेशी फंडिंगच्या जोरावर तरुणांची दिशाभूल करायची आणि देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन करायची, हा कट उघडा पडल्यानंतर सरकारने त्यावर नियमानुसार कारवाई केली. जेव्हा एखादा तरुण आंदोलनाच्या आडून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतो, तेव्हा तो केवळ विद्यार्थी किंवा तरुण राहत नाही, तर तो कायदा मोडणारा गुन्हेगार ठरतो. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच अशा राष्ट्रविरोधी, हिंसक आणि दंगलखोर प्रवृत्तींवर आपल्या घणाघाती शैलीत प्रहार केला होता. परंतु आज त्यांचेच उत्तराधिकारी म्हणवून घेणारे सत्तेच्या लालसेने इतके आंधळे झाले आहेत की, त्यांना देश तोडणाऱ्या टोळ्यांमध्ये, जंतरमंतरवर अराजकता माजवणाऱ्यांंमध्ये आणि डाव्या विचारसरणीच्या हस्तकांमध्ये हुतात्मा दिसू लागले आहेत. हा स्व. बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा आणि हिंदुत्वाचा झालेला गद्दार विचारांनी केलेला घोर विश्वासघात आहे.
खरं तर या लोकांसाठी अवघड विषय आहे. पण एकदा डोळ्यांवरचा द्वेषाचा चष्मा काढून पाहिले तर, संघ नावाची आई देशातील कानाकोपऱ्यात लाखो वंचित, शोषित, वनवासी आणि गरीब बांधवांच्या आयुष्यात प्रकाशाची वात पेटवण्याचे काम करत असल्याचे, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून हजारो आदिवासी मुलांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची व्यवस्था करत असल्याचे, सेवा भारतीच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात मोफत दवाखाने, संस्कार वर्ग आणि रोजगार प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचे, सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत ठेवून सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या भीषण महामारीत घरात बंद होते, तेव्हा तुम्ही वातानुकूलित बंगल्यात बसून फेसबुक लाईव्ह करत असताना, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून रोज कोट्यवधी लोकांना अन्न, औषधे आणि रक्ताचा पुरवठा करणारे संघाचे स्वयंसेवकच असल्याचे लक्षात येईल.
जंतरमंतर असो वा मुंबईतील रस्ते, आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांच्या गाड्या अडवणे, त्यांना धक्काबुक्की करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि कायद्याची पायमल्ली करणे याला जर ‘उबाठा’ गट ‘क्रांती’ समजत असेल, तर त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. रिया अहिरसारख्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांंचे गोडवे गाताना, पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे पाप हे ठाकरे बंधू करत आहेत. खिळे लावलेले दंडुके आणि एके-४७ असे खोटे नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांंना, याच डाव्या विचारसरणीच्या लोकांनी देशात आणि विद्यापीठांमध्ये घातलेला हैदोस कसा दिसत नाही? ‘कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे दिसते’ म्हणतात, तशीच काहीशी अवस्था मातोश्रीच्या वातानुकूलित खोलीत बसून यांची झाली आहे.
भाजपा आणि संघ यांच्यात तथाकथित ‘केमिकल लोचा’ शोधणाऱ्या उबाठा गटाने आधी स्वतःच्या घरात डोकावून पाहावे. ज्या काँग्रेसने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आयुष्यभर विरोध केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पावलोपावली अपमान केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्यात तुम्हाला कसलाही ‘लोचा’ वाटत नाही का? सत्तेसाठी हिंदुत्वाचा भगवा झेंडा गुंडाळून हिरव्या आणि लाल बावट्याशी सलगी करणाऱ्यांंनी संघाच्या मातृत्वावर शंका घेऊ नये. संघ ही अशी आई आहे जी देशासाठी निःस्वार्थ आणि सुसंस्कारित पिढी घडवते, तुमची अवस्था मात्र सत्तेच्या हव्यासापोटी ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, संघावर चिखलफेक करून ‘उबाठा’ गटाला आपला गमावलेला जनाधार परत मिळवता येणार नाही. ‘सूर्याकडे पाहून थुंकले’ तर ती थुंकी स्वतःच्याच तोंडावर पडते, हा निसर्गाचा साधा नियम आहे, जो संजय राऊतांनी आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी ध्यानात ठेवावा.dr mohanji bhagwat दुसऱ्यांंच्या घरात डोकावून सल्ले देण्यापेक्षा, आपला उरलासुरला पक्ष कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यावे. कारण, आजचा तरुण वर्ग, म्हणजेच तुमची ‘जेन-झी’ उघड्या डोळ्यांनी पाहतेय की, राष्ट्र उभारणीसाठी अहोरात्र कोण झटतंय आणि केवळ स्वार्थासाठी तत्त्वांची होळी कोण करतंय!
९२७०३३३८८६