ऑगस्ट क्रांती मॅरेथॉनमध्ये ३०० धावपटू धावले

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
वर्धा,
august kranti marathon ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रहार संस्था, एस. एस. एन. जे. महाविद्यालयातील एनसीसी युनिट, राष्ट्रीय सेवा योजना युनिट व रोव्हर रेंजर युनिटच्या संयुक्त वतीने ऑगस्ट क्रांती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातून ३२५ धावपटूंनी सहभाग नोंदवला.
 
 
august kranti marathon
 
रविवार ९ रोजी संपन्न झालेल्या ‘ऑगस्ट क्रांती मॅरेथॉन’च्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी स्थानिक विकास भवन येथे धावपटूंशी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी माजी खा. रामदास तडस, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते, इमरान राही, स्काऊटचे जिल्हा संघटक नीतेश झाडे, डॉ. राजेंद्र बोरकर, प्रा. रवींद्र गुजरकर, संतोष तुरक, प्राचार्य डॉ. सुनीता सोनारे व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
 
चले जाव चळवळीच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रहार समाज जागृती संस्थेची २५ वी ऑगस्ट क्रांती मॅरेथॉन तरुण-तरुणींकरिता प्रेरणादायी असून अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. ‘सेवाग्राम’ वर्धा ही चले जाव चळवळीची वैचारिक भूमी होय, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
यावेळी रामदास तडस म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण खेळाडूसारखे जीवन जगले पाहिजे. खिलाडी वृत्ती आपल्याला नेहमी सक्रिय, स्पर्धात्मक व सुजान ठेवत असते, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकातून कॅप्टन मोहन गुजरकर यांनी ‘चले जाव’ चळवळीचा इतिहास सांगून सेवाग्राम-वर्धेचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
 
६ किमी पुरुष खुल्या गटातील मॅरेथॉनमध्ये ऋषिकेश नरताम, श्रीराम व मंथन घुडे यांनी तर महिलांमध्ये नंदिनी सावरकर, सेजल चौधरी व रागिनी मांढवे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. शालेय मुलांकरिता ३ किमी गटात काव्य भिसे, कुलभूषण लोखंडे व अधिराज पहाडे तर २ किमी मुलींच्या गटात हर्षिता मांडवे, पायल राऊत व निधी भिवनगडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके पटकावली.