वर्धा जिल्ह्यातील ४०० अंगणवाड्या झाल्या स्मार्ट

आणखी ११० अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
वर्धा,
anganwadis in wardha district ग्रामीण भागातील चिमुकल्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे रूपडे बदलण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ हजार ६२७ अंगणवाड्यांपैकी मागील चार वर्षांत तब्बल ४०० अंगणवाड्या स्मार्ट करण्यात आल्या आहेत. या स्मार्ट अंगणवाड्यांमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, खेळातून शिक्षण घेण्याची संधी बालकांना उपलब्ध झाली आहे.
 
 

anganwadis in wardha district 
 
 
स्मार्ट करण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये एलईडी टीव्ही, डिजिटल शैक्षणिक साहित्य तसेच लहान मुलांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाला पूरक विविध उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक भांडी, गॅस शेगडी आदी साहित्याचाही पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांचा केवळ बाह्य चेहरामोहरा बदलला नसून, बालकांना मिळणार्या सुविधांमध्येही वाढ झाली आहे. जिल्ह्यात आणखी ११० अंगणवाड्यांचे रूपडे बदलून त्यांना स्मार्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.anganwadis in wardha district या अंगणवाड्यांमध्येही आधुनिक शैक्षणिक साधने आणि बालकांना आकर्षित करणार्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे.
सध्या पालकांमध्ये कॉन्व्हेंट संस्कृतीविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले आहे. आधुनिक सुविधा, इंग्रजी माध्यम आणि डिजिटल शिक्षणामुळे अनेक पालकांचा कल कॉन्व्हेंटकडे वळला. या पृष्ठभूमीवर अंगणवाड्यांमध्येही आधुनिक आणि आकर्षक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रंगीबेरंगी साहित्य, खेळणी, डिजिटल साधने आणि विविध शैक्षणिक उपकरणांमुळे चिमुकल्यांना अंगणवाडीत येण्याची उत्सुकता निर्माण होत आहे.
मुलांना डिजिटलच्या माध्यमातून शिकविण्यावर भर
स्मार्ट अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता खेळ, कृती आणि डिजिटल माध्यमातून शिकविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण होण्यास मदत होत आहे. शिवाय त्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकास साधण्यासही हातभार लागत आहे.anganwadis in wardha district ग्रामीण भागातील बालकांना शहरातील शाळांप्रमाणेच आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्मार्ट अंगणवाडी उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. उर्वरित अंगणवाड्याही टप्प्याटप्प्याने स्मार्ट झाल्यास जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता आणखी उंचावण्याची अपेक्षा महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी व्यक्त केली.