नाशिकमध्ये ४.३ रिश्टरचा भूकंप!

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नाशिक,
4.3 magnitude earthquake in Nashik नाशिक जिल्ह्यात शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी रात्री अचानक भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रात्री सुमारे १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. काही क्षणांसाठी जमीन हादरल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे सांगण्यात आले.या भूकंपाचा प्रभाव नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये जाणवला. सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरातील नागरिकांना हादरे जाणवले. शहरासोबतच ग्रामीण भागातील काही ठिकाणीही भूकंपाची जाणीव झाली. कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही भागांत धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
 
 

naskil 
 
भूकंपाच्या हादऱ्यामुळे काही घरांमधील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्याच्या घटना घडल्या. काही नागरिकांनी घराच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती दिल्याने परिसरात चिंता आणखी वाढली. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री शहरातही हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ४.३ रिश्टर स्केलची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील भूकंपाच्या घटनांमुळे नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून विशेष नजर ठेवली जात आहे.