महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित युवकांची फसवणूक

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
संभाजीनगर
airport job scam वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. जंतरमंतरवरील आंदोलनात देशभरातील तरुणाईने सक्रिय सहभाग नोंदवला आणि या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही राजीनाम्याची वेळ आली. मात्र, परीक्षा आणि नोकरीच्या आमिषातून उमेदवारांची फसवणूक होण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नसल्याचे संभाजीनगरातील एका धक्कादायक प्रकरणातून समोर आले आहे.
 
 
airport job scam
 
विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय भरतीप्रमाणे पारदर्शक प्रक्रिया असल्याचा आभास निर्माण करून उमेदवारांकडून प्रत्येकी ५०० ते ७०० रुपये शुल्क घेण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. महिन्याला २५ हजार रुपये पगार आणि विमानतळावर चांगल्या पदाची नोकरी मिळणार असल्याच्या आशेने राज्यभरातील शेकडो विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत परीक्षेसाठी दाखल झाले. मात्र, परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
गेल्या महिनाभरापासून ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षेची तयारी करणे आणि नोकरीच्या आशेने तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष केंद्रावर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कंपनीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन संगणकीय परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता परीक्षा घेण्यासाठी आलेली कथित ‘थर्ड पार्टी’ कंपनीही हात वर करत असल्याचा आरोप करण्यात आला. “आम्हाला काहीच माहिती नाही,” असे संबंधितांकडून सांगण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे नोकरीच्या आशेने परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कथित भरती प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपासून नव्हे तर तब्बल महिनाभरापासून विद्यार्थी या प्रक्रियेची तयारी करत होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर आल्यानंतर प्रत्यक्षात परीक्षा घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला.