आतड्याची कात आतून सोलीते...

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
बोली आणि संस्कृती
प्रा. डॉ. अजय देशपांडे
ashadh culture सध्या आषाढ सुरू आहे. आषाढाला अनेक सांस्कृतिक संदर्भ आहेत. आषाढाला महाराष्ट्रातील विविध बोलींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि आशयघन अशी नावे आहेत. कोरकू बोलीत आषाढाला ‘चिखलभवई’ असे म्हणतात तर माडिया, परधानी या बोलीमध्ये ‘नालोमान’ असे म्हणतात. अहिराणी, खानदेशी लेवा, तावडी, मालवणी या बोलींमध्ये ‘आखाड’ म्हणतात, आगर बोलीत आसा किंवा आशार तर कोहळी आणि झाडी बोलीत ‘अकाड्’ म्हणतात. वऱ्हाडीत ‘आखाळ’, ठाकरीत ‘आकाडा’, कातकरीत ‘आसाड’, पोवारीत ‘अखाड्’ तर मावची बोलीत ‘राख्यू’ असे म्हणतात.
 
आषाढाला 
 
 
।। आखाड कोपला बाई, गं..।।
पंढरपूरची वारी आषाढात असते. वारीचा सांस्कृतिक संदर्भ असलेल्या आषाढात अनेकदा अतिवृष्टीही होते. मृग नक्षत्रात पेरणी हुकली म्हणजे झाली नाही तर आषाढात अती पावसाने शेतीचे नुकसान होत असते, असा लोकसमज आहे. ‘मिरगाचा चुकला पेरा’ या वाक्प्रचाराचा संदर्भ पेरणी झाल्यानंतर अती पावसाने झालेल्या नुकसानाशी आहे. कवी इंद्रजित भालेराव यांची पुढील कविता या संदर्भात लक्षणीय आहे.
आखाड कोपला बाई, गं,
रानात झडपल्या गाई
सळकावर सळकी धारा, गं,
पाण्याच्या झाल्या गारा
आखरात गुराखी ओले, गं,
कावरेबावरे झाले
आभाळ वाकली फांदी गं,
तिफणीचे सुटले नंदी
वावुरात झाला डेरा, गं,
मिरगाचा चुकला पेरा..
या कवितेत आखाड हा वऱ्हाडी आणि मराठवाडी बोलीतील शब्द आहे झडपल्या म्हणजे पावसाचा मारा, सळकावर सळकी या मराठवाड्यातील बोलीतील शब्दाचा जोरदार पावसाच्या सरीवर सरी असा आहे आखर या वऱ्हाडी शब्दाचा अर्थ गावातील घरांच्या अंगणाच्या पुढची मोकळी जागा असा आहे. तिफन, वावुर, मिरग, पेरा, नंदी हे विदर्भ-मराठवाड्यातील गावगाड्यातले शब्द आहेत. या कवितेत ‘मिरगाचा चुकला पेरा’ ही दुःखद बाब सांगण्यासाठी निसर्ग आणि माणूस यांच्यातील ताणेबाणे सांगितले आहेत. दर दुसऱ्या ओळीत येणाऱ्या ‘गं’ मुळे आणि पहिल्या ओळीत येणाऱ्या ‘बाई’ या शब्दामुळे स्त्रीने साधलेला संवाद या कवितेत आहे, हे स्पष्ट आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्री सोबत बोलत आहे, हे देखील अगदी स्पष्ट आहे. ‘गं’च्या अगोदरचा शब्द आणि त्यापुढच्या ओळीतील शेवटचा शब्द यात यमक साधला आहे. या साऱ्यांमुळे ही कविता लोकगीतासारखी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. ‘मिरगाचा चुकला पेरा’ ही दुःखद बाब सांगताना उमाळा दाटून येतो आणि शब्दातीत दुःखाला गीतसदृश लयदार शब्द गवसतात.
पावसाने पदरात सुख दिले काय अन् दुःख दिले काय; कधी निसर्गाशी तर कधी परस्परांशी संवाद साधताना नेहमीच लोकवाणीने गीतांचा आधार घेतला आहे. निसर्गाचा कोप असेल किंवा त्याने भरभरून दान दिले असेल, लोकप्रतिभेला गीतरचनेचे स्फुरण झालेलेच आहे.ashadh culture भालेरावांची प्रतिभा सातत्याने लोकवाणी, लोकगीत, लोकरीत, लोकसंस्कृती यांच्याशी संवाद साधत असते. ‘मिरगाचा चुकला पेरा’ ही घटना सांगताना भालेरावांची प्रतिभा लोकप्रतिभेशी सृजनसंवाद साधते, लोकप्रतिभेशी तादात्म्य पावते.
।। दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा ।।
काळी काळी रातबाई गोरी गोरी होते
गोष्टीच्या नादानं सूर्य वरी वरी येते
दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा
गाण्याच्या ओढीनं तुला ओढिते दगडा
या ओळी म्हणजे साक्षात जात्यावरची ओवी होय. या कवितेचा रूपबंध जसा ओवीचा आहे तसा आशयही स्त्रीच्या आदिम दुःखाशी तादात्म्य पावला आहे. ‘दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा’ या ओळीत स्त्रीच्या आदिम दुःखाचे, व्यथेचे सूचन आहे. ‘रगडा’ या बोलीतील शब्दाच्या उपयोजनातून ते नेमके व्यक्त झाले आहे. पण ‘गाण्याच्या ओढीनं तुला ओढिते दगडा’ या ओळीत मात्र स्त्रीच्या आदिम दुःखभोगाचे तिच्या सृजनशील प्रतिभेशी असणारे नाते उजागर झाले आहे. जात्यावर दळण दळताना गाणे म्हणत बाया आपल्या दुःखाची आळवणी करीत असतात. ‘जीवाचा रगडा होणे’ हा बोलीतील वाक्प्रचार आहे. दगडाच्या जात्यामध्ये दाण्यांचा रगडा होतो, दाणे रगडून चुरा होऊन मग पीठ होतात. ही रगडा होण्याची दुःखभोगी अवस्था स्त्रीच्या वाट्याला येत असते.
‘काळी काळी रातबाई गोरी गोरी होते’ या ओळीत दोन अर्थ आहेत. पहाटेच्या अंधारात दळणे आणि गाणे म्हणणे सुरू केले. अंधार संपून उजेड पडला म्हणजे रात्र गोरी झाली हा एक अर्थ आणि सारवलेल्या काळ्या जमिनीत जात्याची पाळू लावलेली असते, रात्रीच्या अंधारासारखी काळी काळी भूमी जात्यातून पांढरे पीठ गळून गोरी गोरी होते हा दुसरा अर्थ होय. काळी रात गोरी होते, पण स्त्रीच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार मात्र संपतच नाही.
 
।। जगाचं माहेर जन्माला घालिते ।।
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ हा आशयघन वाक्प्रचार विदर्भात व मराठवाड्यात बोलीत रुजलेला आहे. हा लयदार वाक्प्रचार स्त्रीच्या दुःखभोगी सृजनशील प्रतिभेची एक साक्ष आहे. इंद्रजित भालेराव यांची एक कविता या वाक्प्रचाराचे आशयसामर्थ्य अभिव्यक्त करणारी आहे.
नाजूक साजूक घडविली काया
अन्याय का असा केला देवराया
लेकीचा जलम फुटणारी लाही
खाणारा म्हणीतो भाजलीच नाही
तेव्हा राख होते मनातली माया
लेकीचा जलम लेकीला कळतो
आत-आत कसा आतमा जळतो
जळतं त्यालाच लागतं कळाया
आतड्याची कात आतून सोलीते
जगाचं माहेर जन्माला घालीते
नाळ वाळताच लागते छळाया
अन्याय का असा केला देवराया
नाजूक साजूक घडविली काया
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ या लोकवाणीने माहेर या संकल्पनेचे चिरकाल अस्तित्व नोंदवून ठेवले आहे. आईच्या गर्भाशयात मूल वाढते म्हणजे ‘आतड्याची कात आतून सोलीते’ ही प्रक्रिया होय. ही जीवघेणी प्रक्रिया नव्या जिवाला जन्म देत असते. मायच्या तीळ तीळ अंशावर गर्भातला जीव अंकुरतो, झुलतो, वाढतो, जगतो. सृजनशीलतेची शब्दांतीत ऊर्जा असणारी स्त्री खऱ्या अर्थाने माय आणि माहेर असते; पण उदरातून बाहेर आल्यावर नाळ सुकली की, माय नावाच्या माहेराचा सर्वच पुरुषांना सोईस्कर विसर पडतो. ‘लेकीचा जलम फुटणारी लाही, खाणारा म्हणतो भाजलीच नाही’ या ओळी स्त्रीपणाचे अनिवार दुःख उत्कट आवेगाने कवेत घेणाऱ्या आहेत. या कवितेतील आशयावर आणि शब्दसौष्ठवावरही लोकवाणीचा, लोकराहणीचा संस्कार आहे.
 
।। गवताची नावे, गवताच्या कविता ।।
गवताला बोलीत तन म्हणतात. इंद्रजित भालेराव यांच्या भूमीचे मार्दव या संग्रहात गवताविषयीच्या कविता आहेत. गवताच्या सर्व प्रकारांना बोलीत वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण नावे आहेत. पानगवत, रानलहू, पानलहू, लव्हाळी, कुसळी, टाळोक, खर्चूला , हराळी, कुंथा, कासवाड, कसई, आवधान, लोणा, पंधाड, दिवाळी, उन्हाळी, लाजाळू, दाणाळू, लांडगा, कुत्री अशी कितीतरी नावे गवताच्या प्रकारांची आहेत.
कुंधा नावाचे एक गवत आहे
त्याच्या बुंध्याला बेची म्हणतात
बेचीतून बेची निघत राहते
आणि त्यांचा एक बद तयार होतो
अशा रानात तयार झालेले बद
एकमेकांच्या जवळ-जवळ येतात
आणि मग सगळेच्या सगळे रान
आपल्या ताब्यात घेऊन टाकतात
इंद्रजित भालेराव यांच्या या ओळींतून कुंथा या गवताचे वैशिष्ट्य कळते. कुंथा गवताशी संबंधित बेची, बद हे शब्द लोकवाणीने घडवले आणि जिवंत ठेवले आहेत. विविध बोलींनी शब्द जपले. गावगाड्यातल्या माणसांनी बोलींचे जतन केले. आपण बोलींचे ऐश्वर्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
९८५०५९३०३०