खेळाडू ठराविक वेळेत तंदुरुस्त होण्यास ‘यंत्रे’ नाही

सीओई व संघ व्यवस्थापनात उत्कृष्ट समन्वय

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
बेंगळुरू, 
Athletes are not machines क्रिकेटपटूंच्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्यास त्यासाठी या केंद्राला दोष देऊ नये; कारण क्रिकेटपटू काही 'यंत्रे' नाहीत की जे प्रत्येक वेळी निश्चित केलेल्या वेळेतच पूर्णपणे बरे होतील, असे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण रविवारी म्हणाले. सीओई व संघ व्यवस्थापन यांच्यात 'अखंड' समन्वय असल्याचे लक्ष्मण यांनी अधोरेखित केले.प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू खेळाडू हर्षित राणा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि वरच्या फळीतील फलंदाज बी. साई सुदर्शन हे काही असे खेळाडू आहेत जे सध्या सीओई मध्ये आपापल्या दुखापतीतून सावरत आहेत.
 
 
 
Athletes are not machines
 
"पहा, सीओई हे केवळ पुनर्वसन केंद्र नाही, तर क्रिकेटपटूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. सीओई व दोन्ही संघांचे व्यवस्थापन तसेच दोन्ही संघांचे एसएसएम कर्मचारी यांच्यात उत्कृष्ट समन्वय आहे. त्यामुळे त्यांच्यात अखंड संवाद साधला जातो. तंदुरुस्तीचे कडक निकष आणि मानवी शरीराची रचना पाहता, एखाद्या खेळाडूसाठी विशिष्ट वेळेत पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त करणे कठीण असते, असे लक्ष्मण म्हणाले.मार्गदर्शक तत्त्वे आणि वेळापत्रक हे अपेक्षांवर आधारित असतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, पण हे मानवी शरीर आहे. हे काही यंत्र नाही की जिथे वेळापत्रकाचे नेहमीच तंतोतंत पालन होईल. त्यामुळे खेळाडूची प्रगती कशी होत आहे हे समजून घेण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. दुखापतीचे निदान झाल्यापासून ते सीओईमधून बाहेर पडेपर्यंत आणि तंदुरुस्त घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया चालते, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
या प्रक्रियेत, निवडकर्ता 'सेंटर ऑफ एक्सलन्स'कडे खेळाडूच्या तंदुरुस्तीचा अहवाल मागवतो; आम्ही तो अहवाल गोळा करून निवड समितीच्या अध्यक्षांना पाठवितो व त्याची प्रत संघांचे मुख्य प्रशिक्षक व बीसीसीआयलाही दिली जाते. खेळाडूंची निवड ही त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते. त्यामुळे, तंदुरुस्तीची मंजुरी मिळाल्यासच बुमराह व सुदर्शन यांची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड होणार होती. दुखापती हा खेळाडूच्या कारकिर्दीचाच एक अविभाज्य भाग आहे व ही चिंतेची बाब आहे असे मला वाटत नाही. एखादा खेळाडू उच्च स्तरावर खेळत असतो, तेव्हा त्याला आपली १०० टक्क्यांहून अधिक क्षमता पणाला लावावी लागते. त्यामुळे मला वाटते की, दुखापती हा कोणत्याही खेळाडूच्या प्रवासाचा एक भाग असतो. खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे ५१ वर्षीय लक्ष्मण म्हणाले.बीसीसीआयच्या सीओईमधील फिटनेस कर्मचारी- ॲड्रियन, निक तसेच कमलेश हे काम योग्यरित्या करीत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
 
 
खेळाडू तंदुरुस्त झाला, तरच संघात समाविष्ट केला जाईल : सैकिया
दुखापतग्रस्त खेळाडूंच्या पुनर्वसनाची एक प्रक्रिया आहे. आम्ही एसएसएम व एस ॲण्ड सी प्रक्रियेअंतर्गत काही निकष निश्चित केले आहेत. जोपर्यंत ते निकष पूर्ण होत नाहीत किंवा त्याहून चांगली कामगिरी होत नाही, तोपर्यंत आम्ही खेळाडूंना खेळण्यासाठी मुक्त करत नाही. यामागचा मुख्य उद्देश असा आहे की, संघात खेळाडू परततो, तेव्हा त्याने पहिल्या सामन्यापासूनच आपल्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करावी, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले.२१ किंवा २८ दिवसांच्या कालावधीत खेळाडू तंदुरुस्त झाला आणि त्याची निवड झाली, तर त्याला संघात समाविष्ट केले जाईल. साधारणपणे, संघ रवाना होण्याच्या किमान तीन ते चार आठवडे आधी आमच्या निवडीच्या बैठका होतात. त्यामुळे, त्या वेळी खेळाडूच्या तंदुरुस्तीची नेमकी स्थिती आम्हाला माहित नसते. म्हणूनच, 'तंदुरुस्तीच्या अधीन' अशी अट घातली जाते, कारण तो विशिष्ट खेळाडू पुनर्वसन प्रक्रियेतून जात असतो, असे ते म्हणाले.