बारामती
baramati airport बारामती विमानतळ परिसरात शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना आज पुन्हा एकदा घडली. प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे हे विमान कोसळल्यानंतर विमानतळ प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, तसेच विमानातील पायलट सुरक्षित आहेत का, याबाबतची अधिकृत माहिती आणि सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.
बारामती विमानतळावर विमान अपघातांची मालिका सुरूच असल्याने हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात बारामती विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शिकाऊ विमाने कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, आता पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याने चिंता वाढली आहे.
बारामतीमध्ये खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून नवख्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र, गेल्या काही काळात बारामती आणि आसपासच्या परिसरात शिकाऊ विमाने कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे बारामती विमानतळावरील हवाई सुरक्षा व्यवस्था तसेच प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.आजची दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा तपास सुरू आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला की प्रतिकूल हवामान परिस्थिती त्यामागे कारणीभूत ठरली, याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात येत असून, अधिकृत तपशील समोर आल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.