बुलढाण्यातील वीरपुत्राचे उत्तराखंडमध्ये वीरमरण!

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
Brave son from Buldhana martyred बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यावर शोककळा पसरवणारी घटना उत्तराखंडमधून समोर आली आहे. अतिउंचावरील दुर्गम सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत असताना भारतीय सैन्यदलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शेलसुरसह चिखली तालुका आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.हवालदार हरिदास कापसे हे बुलढाणा जिल्ह्यातील शेलसुर येथील मूळ रहिवासी होते. सध्या त्यांचे कुटुंब चिखली शहरातील दांडे ले-आऊट परिसरात वास्तव्यास आहे. भारतीय सैन्यदलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपअंतर्गत ४११ (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनी, आग्रा येथे ते कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंडमधील अतिउंचावरील सीमावर्ती भागात करण्यात आली होती.
 
 

Brave son from Buldhana martyred 
 
७ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर असताना हरिदास कापसे यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वतः जवळच्या वैद्यकीय कक्षात गेले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना काहीसे बरे वाटले. प्रकृती सुधारल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजेरी लावली.मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. सहकारी जवानांनी त्यांना तातडीने वैद्यकीय कक्षात दाखल केले. लष्करी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना हवालदार हरिदास कापसे यांना आलेल्या वीरमरणाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच शेलसुर, चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून या शूर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.