वर्धा,
cricketers jungle excursion देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाला राजस्थान रॉयल्स संघाच्या स्टार क्रिकेटपटूंनी ७ रोजी भेट देऊन बोर सफारीचा आनंद लुटला. क्रिकेटच्या मैदानाबाहेर वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, रवी सिंग आणि सुशांत मिश्रा यांनी जंगलभ्रमंती करीत वनवैभवात चार तास घालवले. राजस्थान रॉयल्स संघातील स्टार क्रिकेटपटूंनी राहाटी परिसरातील व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद लुटला. वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, रवी सिंग आणि सुशांत मिश्रा यांच्यासह राजस्थान रॉयल्सच्या तळेगाव क्लबचे व्यवस्थापक रोमी, कोच व इतर आरआर स्टाफने जंगल सफारी केली.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार कामगिरीने लक्ष वेधून घेणार्या या क्रिकेटपटूंनी यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात जवळपास चार तास घालवले. शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच वाजता सफारीला सुरुवात झाली आणि सायंकाळी ७ वाजता ते परतले. सफारीदरम्यान क्रिकेटपटूंना बिबट, अस्वल, सांबर, चितळ, मोर यांसह विविध वन्यजीवांचे दर्शन झाले. जंगलातील निसर्गसौंदर्य आणि वन्यजीव पाहून क्रिकेटपटूंनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, सफारीत वाघाच्या दर्शनाचीही उत्सुकता होती. मात्र, वाघाचे दर्शन अगदी थोडक्यात हुकल्याने त्यांची वाघ पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली.cricketers jungle excursion या सफारीदरम्यान वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. क्रिकेटपटूंना जंगलातील जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि सफारीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. सफारीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, क्षेत्र सहायक व्ही. एन. केलकर, बीट गार्ड सिद्दिकी, बीट गार्ड विष्णू कदम, वनमजूर किशोर बच्चेरे तसेच फोटोग्राफर आकाश मुंगले उपस्थित होते. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंच्या या जंगल सफारीमुळे व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेर बोरमध्ये रमलेल्या या स्टार क्रिकेटपटूंची सफारी परिसरात चर्चेचा विषय ठरली.