वॉशिंग्टन,
difficult to live in US if you lose job अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नोकरी गमावल्यानंतर नवीन रोजगार शोधण्यासाठी मिळणारी ६० दिवसांची सवलत म्हणजेच ‘ग्रेस पीरियड’ रद्द करण्याचा अमेरिकन सरकार विचार करत आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप लागू झालेला नाही. तो सध्या व्हाईट हाऊसच्या ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटकडे अर्थात OMB कडे पाठवण्यात आला आहे. हा बदल प्रत्यक्षात लागू झाल्यास अमेरिकेतील एच-१बी व्हिसाधारकांसाठी नोकरी गमावल्यानंतरचा काळ अधिक आव्हानात्मक होऊ शकतो. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या सुमारे ५ लाख भारतीयांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या विषयावर भारतानेही अमेरिकेसमोर आपली भूमिका मांडली आहे. यावर्षी मे महिन्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. अमेरिकेची इमिग्रेशन व्यवस्था बदलण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता रुबियो यांनी मान्य केली होती. मात्र, अमेरिकेची स्थलांतर व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे बदल केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रस्तावित पावले विशेषतः भारताला लक्ष्य करून उचलली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत देशासमोर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतराचे आव्हान निर्माण झाले आहे. २ कोटींहून अधिक लोकांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला असून, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी इमिग्रेशन व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एका बाजूला H-1B व्हिसाधारकांसाठी नियम कडक होण्याची शक्यता असताना दुसरीकडे अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या लोकांसाठी कायमस्वरूपी निवासाचा मार्ग खुला करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करण्यात आलेल्या एका विधेयकात गेल्या ७ वर्षांपासून अमेरिकेत सातत्याने वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव आहे. ग्रीन कार्डला अधिकृतपणे ‘पर्मनंट रेसिडेंट कार्ड’ म्हटले जाते. त्याद्वारे अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते. सध्याच्या नियमांनुसार एच-१बी व्हिसावर असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यास त्याला लगेच अमेरिकेबाहेर जावे लागत नाही. अशा कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त ६० दिवसांचा ‘ग्रेस पीरियड’ मिळू शकतो. या कालावधीत तो नवीन नोकरी शोधू शकतो किंवा अमेरिकेतील आपला इमिग्रेशन दर्जा कायम ठेवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करू शकतो.
६० दिवसांच्या आत नवीन नोकरी मिळाल्यास नवीन कंपनी H-1B प्रक्रियेसाठी अर्ज करू शकते. काही परिस्थितींमध्ये संबंधित कर्मचारी अर्जाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा न करता नवीन नियोक्त्याकडे काम सुरू करू शकतो. मात्र, यासाठी संबंधित इमिग्रेशन नियम आणि पात्रता लागू होतात.नवीन नोकरी मिळाली नाही तरी काही पर्याय उपलब्ध असू शकतात. परिस्थितीनुसार संबंधित व्यक्ती दुसऱ्या व्हिसा श्रेणीत किंवा इमिग्रेशन दर्जात बदल करण्यासाठी अर्ज करू शकते. काही प्रकरणांमध्ये आश्रित किंवा अभ्यागत दर्जासाठी अर्ज करण्याचा पर्याय असू शकतो. तसेच संबंधित व्यक्ती ग्रीन कार्डसाठी पात्र असल्यास उपलब्ध नियमांनुसार पुढील प्रक्रिया करता येऊ शकते. मात्र, ६० दिवसांच्या कालावधीत नवीन नोकरी मिळाली नाही आणि इमिग्रेशन दर्जा बदलण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू केली नाही, तर अमेरिकेत राहणे अडचणीचे ठरू शकते. विशेषतः अधिकृत मुक्कामाची मुदत संपल्यानंतर संबंधित व्यक्तीला अमेरिका सोडावी लागू शकते. त्यामुळे प्रस्तावित बदल लागू होतो की नाही, याकडे अमेरिकेतील H-1B व्हिसाधारकांसह भारतीय समुदायाचे लक्ष लागले आहे.