मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
dr-neelam-gorhe हुडकेश्वरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत पीडित मुलीला सहन करावा लागलेला शारीरिक आणि मानसिक त्रास, तिच्यावर निर्माण झालेली दहशत तसेच संपूर्ण घटनेचे गांभीर्य याची संवेदनशीलतेने दखल घेणे आवश्यक आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य आरोपींपर्यंतही पोलिसांनी पोहोचणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

neelam 
 
 

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी हुडकेश्वर पोलिस ठाण्याला भेट देऊन या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. यावेळी शहराचे सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गुन्ह्याचा तपास, आरोपीची पृष्ठभूमी, मोबाईल व अन्य डिजिटल पुरावे, सायबर तपास आणि संभाव्य लागेबांधे याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आरोपीने यापूर्वी नागपूरबाहेर अन्य जिल्ह्यांत किंवा राज्यांत अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का? त्याला आणखी कोणाची मदत मिळाली आहे का? याचीही चौकशी करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आरोपीचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया व अन्य डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करावे. त्याच्या संपर्कातील संशयित व्यक्तींची सायबर तपासाच्या माध्यमातून पडताळणी करावी तसेच परिसरातील नागरिकांकडूनही आवश्यक माहिती घेऊन तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली.

हुडकेश्वर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे डॉ. गोऱ्हे यांनी विशेष कौतुक केले.


न्यायालयाने जनभावनांचा आदर व्हावा

प्रकरणाची व्याप्ती, आरोपीची पृष्ठभूमी, त्याचे अन्य जिल्हे किंवा राज्यांतील संभाव्य संबंध, मोबाईल व डिजिटल पुरावे, सायबर तपास तसेच त्याला मदत करणाऱ्या अन्य व्यक्तींचा शोध या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर तपासासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी अपुरा वाटतो, त्यामुळे जनभावनांचा आदर व्हायला हवा. आवश्यकता भासल्यास सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून मोबाईल व अन्य डिजिटल पुराव्यांचे सखोल तांत्रिक विश्लेषण करून त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.


पोलिस खात्याचे टोचले कान

महिला दक्षता समित्यांची भूमिका अधिक परिणामकारक करण्याची आवश्यकता व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे यांनी या समित्यांचे काम केवळ बैठकांपुरते मर्यादित राहू नये, असे सांगितले. प्रतिबंधात्मक कारवाई, महिला व मुलींमध्ये कायद्यांविषयी जनजागृती तसेच पोलिस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्यावर भर द्यावा. पोलिस, दक्षता समिती आणि प्रशासन यात संवाद होत नाही. बैठकांमध्ये फक्त चहापान होईल, एवढ्यावरच पोलिस थांबतात. पोलिसांनीसुद्धा गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.