प्रश्न विचारणे अस्सल भारतीय परंपरा

अर्जुनाच्या प्रश्नांतूनच ‘भगवद्गीते’चा जन्म: राज्यपाल

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मुंबई,
governor jishnu dev verma कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता चौकस बुद्धीने प्रश्न विचारणे, हा पाश्चात्य विचार नसून तो आपल्या समृद्ध अन् अस्सल भारतीय संस्कृतीचाच भाग आहे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारले नसते, तर जगभरात ‘ग्रंथांचा ग्रंथ’ म्हणून गौरवली गेलेली 'भगवद्गीता' निर्माणच झाली नसती, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
 
governor jishnu dev verma
 
मुंबईत 'इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स' संस्थेच्या वतीने आयोजित 'आयमीन' चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्रात राज्यपाल बोलत होते. देशातील १०० शहरांमधील आणि ५ देशांतील २,१०० हून अधिक 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' युवा प्रतिनिधींशी त्यांनी थेट संवाद साधला.
 
 
भारतीय परंपरेतील स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले की, आपल्या संस्कृतीत अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. या सर्व स्त्रिया आपल्या काळातील बंडखोर होत्या. त्यांनी सरधोपट मार्ग न निवडता शक्य तिथे प्रस्थापितांना सवाल केले. सावित्रीने तर स्वतःच्या बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्ध संवादाच्या जोरावर प्रत्यक्ष मृत्यूची देवता असलेल्या यमराजालाही सवाल केले होते, हीच भारतीय विचारांची खरी ताकद आहे.
‘नेति नेति’ संकल्पनेतून सत्यान्वेषण
उपनिषदांमधील ‘नेति नेति’ (हे नाही, हेही नाही) या उल्लेखाचा संदर्भ देत राज्यपालांनी सांगितले की, या संकल्पनेमुळेच भारतीय तत्त्वज्ञानात सत्यान्वेषण नवनव्या मार्गाने झाले. ही संकल्पना मानवी मनातील चौकस बुद्धीला चालना देणारी आहे.
नियमांच्या चौकटीतच स्वातंत्र्याचा खरा आनंद
स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा सुंदर मेळ घालताना राज्यपालांनी शास्त्रीय संगीताचे उदाहरण दिले. एखाद्या रागातील स्वरांची चौकट पाळली, तरच वेगवेगळे गायक त्या चौकटीत राहून नवनवीन पद्धतीने गाण्याचे स्वातंत्र्य उपभोगू शकतात. गाण्याचा आनंद घेण्यासाठी रागाची चौकट जशी कसोशीने पाळावी लागते, तसेच ठराविक नियमांच्या चौकटीत राहूनच स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येतो, असा मौलिक मंत्र त्यांनी तरुणाईला दिला.