सिद्धार्थ रामटेके
नागपूर,
एकेकाळी ‘नागपूर म्हणजे ग्रीन सिटी‘ अशी ओळख होती. पण आता ही ओळखच धोक्यात आली आहे. नागपूर महानगर पालिकेच्या वृक्ष गणनेत धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. शहरात ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत एकूण ४१,६५,९१५ वृक्ष आहेत. याच्या तुलनेत नागपूरची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात आहे. याचा अर्थ प्रत्येक नागपूरकरामागे ०.६ झाड इतकाच हिशोब सध्या बसतो.
नागपूरची लोकसंख्या दरवर्षी २-३ टक्क्याने वाढते आहे. नवीन घरे, इमारती, रस्त्यांसाठी झाडे बळी जात आहेत. मिहान, रस्ते रुंदीकरण, मेट्रो, फ्लायओव्हर आणि मोठे प्रकल्प यासाठी गेल्या १० वर्षात हजारो जुनी मोठी झाडे तोडली गेली. त्याच्या बदल्यात १० छोटी रोपे लावली जातात. पण १ मोठ्या झाडाची ऑक्सिजन देण्याची क्षमता १० लहान रोपांना यायला २० वर्षे लागतात. मनपा आणि स्वयंसेवी संस्था दरवर्षी ५-१० लाख रोपे लावतात. पाणी, संरक्षण आणि निगराणीअभावी त्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त रोपे पहिल्या वर्षातच मरतात. त्यामुळे आकडा वाढत नाही. शहरातील नवीन लेआऊटमध्ये बिल्डर आणि नागरिकांकडून परवानगीशिवाय झाडे तोडण्याचे प्रकार वाढले आहेत.
कोट्यवधींचा खर्च, पण परिणाम?
मनपा दरवर्षी वृक्षारोपण, संगोपन आणि उद्यान विकासासाठी १५ ते २० कोटी रुपये खर्च करते. ‘एक वृक्ष दहा वृक्षांसारखा‘ सारख्या मोहिमा राबवल्या जातात, पण जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, ‘निरोगी शहरासाठी प्रति व्यक्ती किमान १ झाड आणि ९ चौरस मीटर हिरवी जागा हवी. नागपुरात दोन्ही निकष फेल आहेत. फक्त आकडे वाढवून उपयोग नाही, जगणारी झाडे वाढवावी लागतील.
लावतो आणि विसरतो
जून-जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होते. फीत कापणे, भाषणं, वृत्तपत्रात बातम्या. पण ऑगस्टनंतर त्या रोपांना पाणी कोण देणार? संरक्षण कोण करणार? याचा विचारच नाही. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त रोपे पहिल्याच उन्हाळ्यात करपतात.
चौकट...
झोननिहाय रिपोर्ट कार्ड
मनपाने आतापर्यंत ८ झोनची गणना पूर्ण केली आहे. १ झोनमध्ये काम सुरू आहे आणि १ झोन बाकी आहे.
टॉप ३ हिरवे झोन:
-लक्ष्मीनगर झोन : ११,०७,५८० वृक्ष - शहरात सर्वाधिक. येथे निवासी भागासोबत मोकळ्या जागा आणि उद्याने जास्त आहेत.
-नेहरू नगर झोन : ७,४०,९५६ वृक्ष
-धंतोली झोन : ६,०१,४४७ वृक्ष
सर्वात कमी झाडे असले झोन
-सतरंजीपुरा झोन : ४२,८३५ वृक्ष - घनदाट वस्ती आणि कमी मोकळ्या जागांमुळे संख्या अत्यल्प
-गांधीबाग झोन : ५९,५२८ वृक्ष - व्यापारी क्षेत्र असल्याने झाडांसाठी जागाच नाही.
इतर झोन :
-आशीनगर : ४,९१,३१०
- हनुमान नगर : ३,९३,३४४
-लकडगंज : २,५३,३१३
सध्या सुरू : धरमपेठ झोन : ४,७५,६०२ वृक्षांची गणना सुरू आहे.
प्रलंबित: मंगळवारी झोन : २१,५३५ वृक्षांची गणना बाकी आहे. हा आकडा जोडला तरीही एकूण संख्या ४२ लाखांच्या आसपासच जाईल.
नागपूरकरांनो, आता तरी सुधरा!
१ व्यक्ती = १ झाड दत्तक : तुम्ही जे झाड लावाल त्याला पुढील ३ वर्षे पाणी आणि खत देण्याची जबाबदारी घ्या.
-सोसायटी-शाळांनी ट्री गार्डियन नेमावे : प्रत्येक ५० झाडांमागे १ व्यक्ती त्याच्या देखभालीसाठी.
-तोडण्यापूर्वी १० पट लावण्याचा कायदा कडक करा : आणि ते झाड ३ वर्षे जगले तरच एनओसी द्या. नाहीतर ‘ग्रीन सिटी‘ ही आपली ओळख केवळ जुने फोटो आणि आठवणींमध्येच राहील.