आनंद स्पंदन
- डॉ. अविनाश मोहरील
happy pulse आरती प्रभूंच्या एका कवितेत त्यांनी लिहिलेय - ‘गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे...’ जेव्हा जेव्हा ही कविता मी वाचतो किंवा आशा भोसलेंनी गायलेल्या स्वरूपात ऐकतो तेव्हा मी ‘तुझे नक्षत्रांचे देणे’ या ओळीपाशी थांबतो. माझ्या मनात या तुझ्याबद्दल नेहमी कुतूहल निर्माण होते. कुणाचे देणे राहून गेले असे कवीला वाटते, याचा विचार करीत राहतो. एखाद्या व्यक्तीचे, परमेश्वराचे, जन्मदात्याचे, निसर्गाचे की स्वतःचेच. स्वतःचेच देणे राहू शकते असे कसे होईल? आपण प्रत्येक जण अंतिमतः स्वतःचाच विचार करीत असतो हे खरे आहे. बिरबलाच्या माकडिणीच्या कथेतही ते सिद्ध झालेय. शेवटी प्रत्येकाला स्वतःचे जीवन सर्वात प्रिय असते आणि आपले देणे राहू शकत नाही. त्यामुळे आरती प्रभूंच्या ओळी स्वतःबद्दल लागू पडणार नाही, असे विद्यार्थिदशेत वाटायचे. परंतु जीवनाच्या वाटेवर असे बरेच लोक भेटत गेले; सोबतच चाळिशी आल्यावर आपल्याही आयुष्याचा कधीतरी जमाखर्च मांडून बघितला तर लक्षात आले की, जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या नक्षत्रांचे देणे स्वतःलाच द्यायचे राहून गेले आहे.

एका मैत्रिणीशी गप्पा मारीत असताना खूप दिवसांनंतर भेट झाल्याने ती स्वतःच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलत होती. डॉक्टर असल्याने तिचा दिवसभराचा दिनक्रम कसा व्यस्त असतो, तिचा स्वतःच्या कामाप्रतीचा दृष्टिकोन कसा आहे, तिचे काम ती किती निष्ठेने करते, आता चाळिशी पार केल्यामुळे ती आता हेल्थ कॉन्शियस कशी झाली आहे, दिवसभरातील दोन तास सुदृढ स्वास्थ्यासाठी ती कशाप्रकारे देते वगैरे वगैरे. तिचे कार्य व कामाप्रतीची श्रद्धा बघून खरोखरीच मनापासून आनंद झाला.
अतिशय उत्साहाने ती हे बोलत होती त्यामुळे आपले जीवन ती किती सकारात्मकतेने जगते आहे, याचा प्रत्यय शब्दांगणीक येत होता. साधारण सहा-सात मिनिटे खळखळत्या प्रवाहागत ती छान बोलत होती... पण अचानक हा प्रवाह एका ठिकाणी जरा थबकला. बोलता बोलता तिचा तो उत्साही स्वर किंचित खिन्नतेकडे वळला. बोलता बोलता ती म्हणाली की, या सर्व कामांमुळे व व्यावसायिक आणि संसारिक जबाबदारींमुळे मला माझे गाणे मात्र पूर्ण करता येत नाही. गाण्याची आवड असूनही, ते शिकण्याची अतूट इच्छा असूनही जमत नाही आणि जमेलसे वाटत नाही; पण हे चालणारच आहे. शेवटी काही मिळविण्यासाठी काही सोडावे लागतेच. तिचे ते वाक्य ऐकल्यावर मला आरती प्रभू आठवले आणि लक्षात आले की, माझ्या मैत्रिणीला सुरांचे सुंदर देणे स्वतःला द्यायचे राहून गेले आहे. अर्थात त्यामुळे ती निराश होते असे नाही. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात असे स्वतःला देणे राहून गेलेले असते. आयुष्य जगत असताना आपण जमिनीवर पसरलेल्या रेल्वे रुळांच्या जाळ्यागत असलेल्या विविध मार्गांवरून मार्गक्रमण करीत असतो. विशेषत: या मार्गांचे संचालन करणारी व्यवस्था नियती या नावाने कार्यरत असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण आपल्याला आवडेल तो मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या मार्गाचे संचालन आपल्या हातात नसल्याने फार काही करता येत नाही. समोर आलेली परिस्थिती मोठ्या मनाने स्वीकारायची व हेच जीवन आपल्याला दिले आहे, असे समजून त्यात प्राण ओतायचा ही माणसाच्या माणुसकीची ओळख असते. स्त्री असो अथवा पुरुष परिस्थितीत फार फरक नसतो. पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे नाही म्हणता पुरुषांना थोडा फायदा होतो, स्वतःचे देणे देण्याचा. नव्या पॅकेजच्या जमान्यात तोही फरक मिटला आता.
किशोर कुमारची गाणी ऐकायची आणि त्याच्यासोबत ती सर्व गाणी मनसोक्त म्हणायची अशी माझ्या मित्राला आवड होती. विद्यार्थिदशेत ज्यावेळी हा छंद जडला तेव्हा दुर्दैवाने वडिलांकडे कॅसेट प्लेयर घेण्याइतपत पैसा नव्हता. त्यामुळे घराच्या मागे असलेल्या पान टपरीवरील किशोरच्या गाण्यावर अवलंबून राहावे लागे. तो पान टपरीवालाही खास होता. वेळेनुसार त्याचे गायक व गायीका ठरलेले असायचे. म्हणजे पहाटे केवळ पवित्र सूर लताबाईंचे. त्यानंतर मगच इतरांचा म्हणजे रफी, तलत, आशा यांचा नंबर लागायचा. किशोर कुमारचा नंबर शेवटचा. तो रात्री १० वाजता यायचा. रात्री १० ते ११ किशोर. माझा मित्र त्यामुळे रात्री १० ते ११ गच्चीवरच असायचा आणि किशोरसोबत बिनधास्त मोठमोठ्याने गाणे गायचा. अशा प्रकारे गाणी ऐकावी लागतात, याचे त्याला फार वाईट वाटायचे. तो म्हणायचा - ‘यार पैसे नाही म्हणून टेपरेकॉर्डर घेता येत नाही अन्यथा किशोरच्या सगळ्या कॅसेट घेतल्या असत्या.’ त्याचवेळी त्याने ठरविले होते की, नोकरी लागल्यावर आपल्या घरात एक मोठे होम थिएटर आणि साऊंड सीस्टिम घ्यायची आणि मनसोक्त किशाेरची गाणी ऐकत आणि गात खूप आनंद लुटायचा. हे किशोरच्या गाण्याचं देणं स्वतःला द्यायचंच. नंतर तो अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासाठी गेला. मी कला शाखेकडे वळलो. साधारण २० वर्षांनी त्याची भेट घेण्याचा योग आला. तो बंगळुरू येथे एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता.happy pulse मी बंगळुरूला आलोय, असे समजल्यावर त्याने मला आग्रहाने त्याच्या घरी बोलाले. मी देखील त्याचे घर बघायला उत्सूक होतो. मला त्याचे किशोरच्या गाण्याचे देणे ठरविल्याप्रमाणे दिले की नाही ते बघायचे होते. तो जसे बोलला होता त्याचप्रमाणे त्याच्या ड्रॉईंग रुममध्ये एक सुंदर आणि अत्याधुनिक साऊंड सीस्टिम लावलेली होती. त्याच्या घराचे पूर्ण अवलोकन केल्यावर मी त्यास किशोरची गाणी ऐकव, असा आग्रह केला. आतापर्यंत अत्यंत उत्साहात सारे घर, घरातील सुविधा, सोयी हे सारे दाखविणारा माझा मित्र अचानक थबकला. त्याच्या पॅकेजचे, घराचे व त्यातील मौल्यवान वस्तूंचे कौतुक करतानाच्या आवाजातील खणखणाट थांबला आणि खालच्या आवाजात तो म्हणाला - ‘ते राहून गेले यार! त्याच्यासाठी वेळच मिळत नाही. सकाळी ८ वाजल्यापासून तो रात्री ९ पर्यंत माझे कामच चालले असते. यासोबतच दिवसभरात कारने तीन तास ऑफिसात येता-जाता प्रचंड वाहतुकीतून ड्रायव्हिंग करणे या सर्व बाबींमुळे मला इतकी सुंदर साऊंड सीस्टिम असतानादेखील किशोर कुमारही ऐकायला वेळ नसतो. ते राहून गेले यार!’
आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात डोकावले तर असे जाणवेल, आपल्याही आयुष्यात स्वतःला काहीतरी द्यायचे राहिले आहे. एखादा छंद लहानपणापासून जोपासत आणलेला असतो, तरुणपणीदेखील तो आपल्या सोबत असतो. परंतु बरेच वेळा पुढील आयुष्याच्या स्पर्धांमध्ये किंवा रामरगाड्यात तो छंद मागे पडतो आणि इतका मागे पडतो की आठवेनासा होतो. आपल्यापैकी काहीच भाग्यवान असतात ज्यांना तो छंद जोपासता येतो, परंतु बरेच वेळा राहूनच गेलेले असते. इतरांना देता देता आपल्या स्वतःला देण्याचे राहूनच जाते. जीवनाची हीच रीत आहे. ती पूर्णतः स्वीकारावी असे मात्र मला व्यक्तिशः अजिबात वाटत नाही. इतरांसाठी जगलेच पाहिजे, पण आपल्यालाही स्वतःला वेळ देण्यासाठी एकच आयुष्य मिळाले आहे, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आनंदासाठी आपल्याला जगताच आले पाहिजे, वेळ काढलाच पाहिजे. कारण तो आपला मनुष्यजन्माचा अधिकार आहे.
आयुष्य कुणाचेच पूर्ण नाही; किंबहुना ‘गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा’ असे कविवर्य म. पां. भावे आपल्याला सांगतात. असे असले तरी ही अपूर्णता कायम आपल्या स्वतःला दिल्या जात असलेल्या देण्याचीच नसावी. आयुष्य जगत असताना सर्वांसाठी जगावे हे आपले संस्कार आहेत, परंतु त्या वेळेपैकी काही वेळ हा स्वतःसाठी काढावा; ज्यावर केवळ आपला अधिकार असेल. असा वेळ देऊन आनंद घेणारा ‘गेले द्यायचे राहून’ असे म्हणत नाही व तसा पश्चात्ताप करण्याची वेळदेखील त्याच्यावर येत नाही. म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांची मदत घ्यावी - ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...’
पुणे। ९४२३१२३९०६