आसाम
heavy rain गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, शनिवारी देशाच्या अनेक भागांत पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. आसाममध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे १५३ रस्ते बंद झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. केरळमध्ये घरे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेकडो नागरिकांना मदत छावण्यांचा आधार घ्यावा लागला आहे.
आसाममधील पुराचा फटका १.५५ लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. राज्यातील पुरामुळे मृतांचा आकडा ९९ वर पोहोचला असून, अद्याप १३ जिल्हे पुराच्या तडाख्यात आहेत. परिस्थितीचा आढावा घेत सरकारकडून रविवारपासून सर्वाधिक प्रभावित असलेल्या पूर्वेकडील चार जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या दृष्टीने नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शनिवारी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ९८.७ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. ऑगस्ट २०२४ नंतरचा हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. विशेष म्हणजे, महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतच दिल्लीतील एकूण पावसाची नोंद मासिक सरासरीच्या जवळपास पोहोचली आहे. सलग पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. कालिंदी कुंज सीमा, आयटीओ आणि मेहरौली-बदरपूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागूनheavy rain मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचले, तर काही भागांत भिंती आणि घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. देवळी येथे खासगी पार्किंगची भिंत कोसळून आठ वाहनांचे नुकसान झाले. तसेच प्रियंका कॅम्प परिसरात पाण्यात वाहून गेल्याने १८ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे.हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील १५३ रस्ते बंद झाले असून अनेक भागांतील वाहतूक प्रभावित झाली आहे. दरम्यान, शिमला हवामान खात्याने सोमवार आणि मंगळवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
पुराचा फटका
केरळमध्ये शनिवारीही पावसाची स्थिती कायम होती. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी अलाप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यांना अद्याप पुराचा फटका बसत आहे. अनेक रस्ते आणि घरे पाण्याखाली गेल्याने शेकडो नागरिक अजूनही मदत छावण्यांमध्ये आश्रयाला आहेत. वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून, बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील आठ जिल्ह्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार मदत छावण्यांमध्ये हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी आसाम, हिमाचल प्रदेश आणि केरळमधील परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.